लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने १०३ वर्षांची परंपरा अबाधित राखत ऑनलाईन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत कलामहाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत या महाविद्यालयातील शिल्पकला विभागातून श्रेयस कळंबाटे, सागर पांचाळ, विश्वनाथ धामणस्कर यांच्या कलाकृती निवडण्यात आल्या आहेत. तसेच याच कला महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी रोहन पवार (मुंबई) याला ५ हजार रुपये तसेच संदेश मोरे याला १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
कोरोनाच्या काळात जरी कला महाविद्याल बंद असले, तरी ऑनलाईन शिकवणे व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे कला महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांचे काम सुरूच होते. विद्यार्थीही आपल्या या यशाचे श्रेय कला महाविद्यालयास देत आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.