अडरे : नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावाचे नेतृत्त्व करताना गावागावातील सामाजिक प्रदूषण दूर होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत. तशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. स्वतः काहीही न करता सतत दुसऱ्याकडे बोट दाखवणाऱ्या भूमिकेकडे फारसे लक्ष न देता आपले गावविकासाचे काम व्रत म्हणून सांभाळावे, असे मत पर्यावरणप्रेमी धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात इतिहास, राज्यशास्त्र आणि आई. क्यू. ए. सी. विभागातर्फे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत, नॅक समन्वयक डॉ. एस. डी. सुतार, समन्वयक डॉ. एन. बी. डोंगरे, प्रा. विकास मेहेंदळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अशा प्रकारच्या कार्यशाळांची आवश्यकता आहे, असे मत खोत यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. नामदेव डोंगरे यांनी केले. डॉ. सुरेश सुतार यांनी कार्यशाळेचा उद्देश उपस्थितांसमोर मांडला. प्रा. विकास मेहेंदळे यांनी वक्ते वाटेकर यांचा परिचय करून दिला.
धीरज वाटेकर म्हणाले की, गावाचे नेतृत्व करताना, समाजाचे आपल्याकडे लक्ष असल्याने विचारपूर्वक कृती करायला हवी, असे त्यांनी म्हटले. आमंत्रणाची वाट न पाहता गावाच्या शाळेच्या संपर्कात राहायला हवे असल्याचे त्यांनी नमूद केले. गावाच्या वेशीवर मोठाल्या कमानी उभारताना, बाहेरून गावात येणाऱ्यांची भावना सकारात्मक व्हावी म्हणून प्रयत्न गरजेचे आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिरवली गावच्या सरपंच प्रियांका कदम, उमरोलीचे सरपंच महेंद्र भडवळकर, मार्गताम्हाणे (खुर्द)चे उपसरपंच गजानन कोतवडेकर, कौंढरताम्हाणेचे सदस्य संजय आग्रे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. डॉ. नामदेव डोंगरे यांनी आभार मानले.