मुंबई-गोवा महामार्गावरील दुसरी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न - मंत्री रवींद्र चव्हाण
By मनोज मुळ्ये | Published: September 12, 2023 04:18 PM2023-09-12T16:18:50+5:302023-09-12T16:19:49+5:30
दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू
रत्नागिरी : मुंबईगोवामहामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसरी मार्गिका डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणे हे एक आव्हानच आहे. महामार्गावरील सर्व पूल, त्यांचे ऑडिट हे काम सोपे नाही. मात्र तरीही ते कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.
मंत्री चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईगोवा महामार्गाची विशेषतः कशेडी बोगद्याची पाहणी केली. त्यांनी याआधीच्या पाहणीप्रसंगी दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईहून येणारे चाकरमानी या मार्गिकेचा वापर करू शकतील. या कामाची मंत्री चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
महामार्गावरील पुलांचे काम अजून बाकी आहे. जे काम अर्धवट झाले आहे त्याचे ऑडिट करणे, ते योग्य आहे की नाही तपासणे आणि त्यानंतर उर्वरित काम करणे ही बाब सोपी नाही. मात्र सकारात्मक पद्धतीने विचार करून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्री चव्हाण यांनी यावेळी बोगद्यातून रवाना होणाऱ्या वाहन चालकांना हात दाखवून शुभेच्छाही दिल्या.