निवडणुका जवळ आल्याने काेल्ह्यांची काेल्हेकुई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:10+5:302021-05-28T04:24:10+5:30
रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे ...
रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे पिंजऱ्यातून बाहेर येऊन कोल्हेकुई करत आहेत. विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी पुढच्या निवडणुकीत नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला असून, तो प्राप्तही झाला आहे. रस्त्यांच्या कामाचा ठेकेदारांना कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारामुळे रस्त्याच्या कामांना विलंब होत आहे. तसेच १५ दिवसात पाऊस न पडल्यास शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करु, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तौक्ते वादळामुळे रस्त्यांचे डांबरीकरण आणि पाणी योजनेच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाणी योजनेचे काम करणाऱ्या सुमारे २५ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने इतर कामगारांनी भीतीमुळे पलायन केले. त्याचबरोबर तौक्ते वादळामुळे पाणी योजना आणि रस्त्यांच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. शहरातील कामांचे कार्यादेश जावेद खान आणि आर. डी. सामंत कंपनीला देण्यात आले आहेत. डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून, पुढील १५ दिवसात पाऊस न पडल्यास रस्त्यांचे ८५ टक्के काम पूर्ण करण्यात येईल. मात्र, आवश्यक ती सर्व तयारी असताना, पाऊस पडल्यास रस्त्याची कामे थांबवावी लागणार आहेत. परंतु, जेवढी कामे होतील तेवढी पूर्ण करण्यात येणार आहेत. काही दिवस शहरवासीयांना त्रास होईल. पण पाणी आणि रस्त्याच्या कामाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.