रिक्त पदांच्या जंजाळात उपनिबंधक कार्यालयावर निवडणुकीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:36+5:302021-08-13T04:36:36+5:30
सागर पाटील / टेंभ्ये : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांमध्ये जिल्हा उपनिबंधकांपासून साहाय्यक निबंधकांपर्यंत व कार्यालयीन स्तरावरील कर्मचाऱ्यांची ...
सागर पाटील / टेंभ्ये : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांमध्ये जिल्हा उपनिबंधकांपासून साहाय्यक निबंधकांपर्यंत व कार्यालयीन स्तरावरील कर्मचाऱ्यांची अनेक पदे जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे हे उपनिबंधक कार्यालयासाठी एक मोठे आव्हान असणार आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विरळ असल्याने या कार्यालयातील अधिकारी पदे परिपूर्ण भरण्याकडे राजकीय स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात नसल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यावर नियंत्रण करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत चालते. जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये साहाय्यक निबंधकांचे स्वतंत्र कार्यालय असते. सध्या जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांचे पद रिक्त असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगवे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे; तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामधील साहाय्यक निबंधक प्रशासन हे महत्त्वपूर्ण पदही रिक्त आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे जिल्ह्यामध्ये साहाय्यक निबंधकांची नऊ पदे मंजूर आहेत. सध्या यांपैकी केवळ दोन पदांवर साहाय्यक निबंधक कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे जिल्हा व तालुका निबंधक कार्यालयामधील जवळपास निम्म्याहून अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत.
कोरोना काळामध्ये सहकारी संस्थांच्या संस्थानच्या निवडणुकांवर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून या संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा बँकेची मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका उपनिबंधक कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी वर्ग पुरेशा प्रमाणात असणे अत्यंत गरजेचे आहे. शासन स्तरावरून याची दखल घेणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील सहकार वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.