वीजपुरवठा नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 02:25 PM2019-07-30T14:25:12+5:302019-07-30T14:35:31+5:30
वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो.
- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. पण ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करत महावितरणचे कर्मचारी वीज सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्यातील पालशेत गावातील वीज सुरळीत करण्यासाठी चक्क महावितरणचा कर्मचारी तारेवरची कसरत करत होता.
पावसाळ्याचे दिवस असल्याने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त असते. या काळात तारा तुटून पडणे, झाड तारांवर कोसळणे, वीजखांब कोसळून वीज जाणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेकवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. काहीवेळेला काही तास विजेची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात. वीज खंडित होऊन जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत असतात.
गुहागर तालुक्यातील पालशेत भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी त्याठिकाणी पोहाचले. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे नदीच्या पलिकडे जाऊन काम करणे कठीण बनले होते. आजूबाजूला असणाऱ्या झाडांमधील विजेच्या तारा मोकळ्या केल्याशिवाय वीज सुरळीत करणे कठीण होते. त्यातच सोसाट्याचा वारा सुटल्याने काम करणे अवघड होते.
अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्याने रस्सीचा आधार घेत नदीच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तुफान वेगाने जाणारा पाण्याचा लोंढा, सोसाट्याचा वारा आणि त्याही परिस्थितीत रस्सीच्या आधाराने नदीपलिकडे जाऊन काम करण्याची जिद्द होती. आपल्या जीवावर उदार होऊन हा कर्मचारी केवळ त्या भागातील वीज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होता. रस्सीच्या आधारावर हा कर्मचारी झाडांमध्ये अडकलेल्या विजेच्या तारा मोकळा करण्यासाठी जीवाशी खेळत होता.