रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये सध्या मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. त्यातच एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्या विभागातील कर्मचारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही दुसऱ्या दिवशी भीतीच्या छायेत काम करीत होते.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर प्रभावीपणे राबविलेल्या उपाययोजना, प्रशासनाने केलेले नियोजन व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाच्या जोरावर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश आले होते. शासकीय कार्यालयात फ्लोअर क्लिनिंग व वर्दळीच्या ठिकाणी औषध फवारणी अशा प्रकारे उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच जिल्ह्यात काही गावांमध्ये कम्युनिटी क्लिनिकही सुरू करण्यात आले होते. त्याचा फायदा कोरोनाच्या प्रादुर्भावात झाला होता.
दरम्यान, पुन्हा मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. ऐन शिमगोत्सवाच्या कालावधीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि कृषी विभागातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेत ५० टक्के कर्मचारी उपस्थितीवर भर देण्यात येत आहे. त्यातच अभ्यागतांकडून परिषद भवनाच्या दरवाजाजवळच अर्ज, निवेदने स्वीकारण्यात येत आहेत. तसेच महत्त्वाचे काम असल्यास नाव नोंदणी व शरीराचे तापमानाची तपासणी करूनच कार्यालयात सोडण्यात येत आहे. अशा प्रकारे जिल्हा परिषदेकडून कोरोना प्रादुर्भावात नियोजन केले जात असून काळजीही घेतली जात आहे.
दरम्यान, मार्च एंडिंगची धावपळ सर्वच कार्यालयात सुरु असल्याप्रमाणे जिल्हा परिषदही यातून सुटलेली नाही. जिल्हा परिषदेत अभ्यागतांची वर्दळ नसली तरी कोविड नियमांचे पालन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तरीही जिल्हा परिषदेतील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मार्च एंडिंगचे कामही कर्मचाऱ्यांकडून भीतीच्या छायेत केले जात आहे.