हर्षल शिराेडकर
खेड : शहरानजीक जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असून, निसर्गसौंदर्य लाभलेल्या या नदीकिनाऱ्याला यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या किनाऱ्यावरच नगर परिषदेचे मटण मार्केट असून, त्यातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा येथेच फेकला जातो. त्यामुळे या भागात अतिक्रमणे आणि अस्वच्छतेचेच दर्शन अधिक हाेत आहे.
जगबुडी नदीवरील भोस्ते पुलालगत खेड नगर परिषदेने गणेश विसर्जन घाट व प्रेक्षक गॅलरी यासाठी लाखो रुपये खर्च करून किनाऱ्याचे सुशोभिकरण केले आहे. मात्र, या गणेश घाटापासून अवघ्या काही फूट अंतरावर असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या व त्यामधून बाहेर पडून उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण अधिक आहे. स्वच्छता अभियान राबविताना केवळ काही दिवसांकरिता दाखवलेला सुज्ञपणा प्रशासन व नागरिकांनीही सोडून दिल्याचे विदारक सत्य या भागात दिसून येते. नगर परिषद प्रशासनाने मच्छी-मटण मार्केट उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, त्या इमारतीत मासे विक्रेत्यांना बसविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे बंदर मार्गाच्या दुतर्फा उघड्या व सार्वजनिक जागेत मासळी विक्री सुरू आहे. मासळी खरेदीसाठी येथे येणारे याच मार्गाच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने येथे वाहतूक कोंडी हाेत आहे.
किनाऱ्यावर उभ्या असलेल्या अनेक इमारतींमध्ये निर्माण होणारे हजारो लीटर सांडपाणी या रस्त्यालगत वाहत जाऊन जगबुडी नदीत मिसळत आहे. शहरातून पावसाचे पाणी जगबुडी नदीत थेट सोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी गटारांचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असून, शहरातील बहुतांश इमारतींचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडण्यात आले आहे. त्याचा निचराही या बंदर मार्गानजीक उघडे ठेवण्यात आलेल्या भुयारी गटारांच्या मुखातून हाेत आहे. भुयारी गटारांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. शहरामध्ये मलेरिया, डेंग्यू व कावीळ यांचे रुग्ण अनेकवेळा बंदर परिसरातील ब्राह्मण आळी, गुजर आळी, साठे-पौत्रिक मोहल्ला, चौगुले मोहल्ला या परिसरातील आढळले आहेत. पर्यटनदृष्ट्या विकसित हाेणाऱ्या या भागातील अस्वच्छता दूर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
---------------------------------------
मच्छीमार्केट असूनही बंदर भागातच मासळी बाजार
मच्छीमार्केट इमारत उपलब्ध असतानाही बंदर मार्गाच्या दुतर्फा दररोज मासळी बाजार भरत आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना यामुळे अडथळा शर्यत पार करावी लागते. तेथेच मासळी साफ केली जात असल्याने दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. तसेच मटण मार्केटमधून टाकाऊ पदार्थ या मार्गाच्या बाजूलाच टाकले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे.