रत्नागिरी : रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीला आपटून राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी ते संगमेश्वरदरम्यानच्या करबुडे येथे बोगद्यात घडली. रेल्वेच्या लोको पायलटने गाडीचा वेग कमी केल्यामुळे केवळ इंजिनच रुळावरुन खाली उतरले. यात कोणीही जखमी झालेले नाही. रेल्वेच्या ६० जणांच्या पथकाने वेगाने केलेल्या हालचालींमुळे अवघ्या पावणेचार तासात वाहतूक पूर्ववत झाली.गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे करबुडे (ता. रत्नागिरी) बोगद्यात एक दरड कोसळून ट्रॅकवर आली होती. शनिवारी पहाटे ४.१५ वाजता राजधानी एक्स्प्रेस तेथे आली. ट्रॅकवर दरड पडल्याचे लोको पायलटच्या (चालकाच्या) लक्षात आले. त्याने तातडीने गाडीचा वेग कमी केला. गाडीचे इंजिन या दरडीवर आपटले. या दणक्यामुळे इंजिन रुळावरुन खाली उतरले.या घटनेची माहिती मिळताच रेल्वेची एआरएमव्ही (ॲक्सिडेंट रिलिफ अँड मेंटेनन्स व्हॅन) अक्षरश: १५ मिनिटात घटनास्थळी पोहोचली. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांच्यासह अभियंते, अधिकारी, कामगार असे ६० जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने काम सुरू करून रेल्वे परत रुळावर आणली. चाके घसरल्याने रुळांचे काही नुकसान झाले आहे का, याची तपासणी करण्यात आली. सात वाजता मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आणि राजधानी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली.वैद्यकीय पथकही हजरकोकण रेल्वेचे वैद्यकीय पथकही घटनास्थळी हजर होते. या पथकाने प्रत्येक डब्यात जाऊन प्रवाशांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. नेमका काय प्रकार झाला आहे, याची माहितीही प्रवाशांना देण्यात आली. कोणीही प्रवासी जखमी झालेला नसल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.मोठा अनर्थ टळलागाडीचा वेग कमी झाल्याने केवळ इंजिनच रुळावरुन खाली उतरले. जर वेग अधिक असता तर पुढच्या काही डब्यांनाही हा दणका बसला असला आणि गाडी बोगद्यात असल्याने मोठा अनर्थ घडला असता.