राजापूरचा पूर म्हणजे एन्जाॅय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:39+5:302021-07-19T04:20:39+5:30

मी नेहमीच म्हणतो, आम्ही राजापूरकर म्हणजे राजापूरचे राजे ! दरवर्षीच्या पावसाळ्यातच काय, आम्ही कायम तसचं जगतो, राजापूरचे राजे ! ...

Enjoy the flood of Rajapur | राजापूरचा पूर म्हणजे एन्जाॅय

राजापूरचा पूर म्हणजे एन्जाॅय

Next

मी नेहमीच म्हणतो, आम्ही राजापूरकर म्हणजे राजापूरचे राजे ! दरवर्षीच्या पावसाळ्यातच काय, आम्ही कायम तसचं जगतो, राजापूरचे राजे ! राजापूर शहरात पूर भरला की, गेल्या काही वर्षापासून पहिला पोटात भीतीचा गोळा येतो तो प्रशासनाच्या ! मग मीडियावाले धावतात, सगळा पूर शुट करतात आणि मग आमचा जवाहर चौक. माफ करा, आमचा दादर सगळ्या चॅनेलवर झळकतो. अख्ख्या महाराष्ट्रातील लोक आमच्या शहरातला पूर बघून घाबरतात. त्यांच्या दृष्टीने बरोबरही आहे ते.

राजापूरच्या पुराच्या गमती (हो हो, गमतीच म्हणेन मी) सांगाव्या तेवढ्या कमीच ! राजापूर शहरात राहणारा प्रत्येक नागरिक (नव्हे, राजा म्हणायला हवे) पाऊस पडायला लागला की मला भविष्यवेत्ता वाटतो. अहो ! वाटतो काय आहेच ! पाऊस पडायला लागला की, त्या पावसाचा रागरंग बघून राजापूरकर पुराची भविष्यवाणी करतात आणि मग सुरुवात होते ती पूररेषेच्या टप्प्यात येणाऱ्या सर्व वस्तू सुरक्षितस्थळी हलवायला. यावेळचा पूर किती मोठा असेल, याचाही अंदाज अगदी परफेक्ट असतो बरं का आम्हाला !

इथला प्रत्येक लहान-थोर पूर आला की, त्याचा मनसोक्त आनंद घेत असतो. आमच्या कित्येक पिढ्या या पुराच्या पाण्यातच वाढल्या, मोठ्या झाल्या. आमची पुराची भविष्यवाणी नेहमीच खरी असते, आजच्या पावसाचा जोर किती? आजचा पाऊस कसा लागतोय, यावरून आम्ही पुराचा अंदाज वर्तवतो आणि कामाला लागतो. गेल्या दोन-चार दशकात राजापूर शहरात शेकडोवेळा पुराचे पाणी भरले असेल पण आम्ही तरीही आनंदीच ! ना आमचं काही वाहून गेलं ना कधी आम्ही उपाशी राहिलो.

इथल्या प्रशासनालासुध्दा कधी मदतीचे काम करावं लागत नाही. आमच्या पुरात ना कोणी अडकून पडतं ना कोणी कोणाला अडकून राहायला देत. राजापुरात जन्माला आलेला माणूस हा पूर कसा आणि किती असेल, याचा परफेक्ट अंदाज घेऊनच जन्माला येतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरंतर तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण काय करणार... हे वास्तव आहे !

मला आठवतं, पूर्वी या पुराला कोणी विचारत नव्हते. आता काळानुरूप पूर टीव्हीवर आला आणि राजापूरकर सोडून सगळ्यांच्या पोटात भीतीचा गोळा यायला लागला. आज हे सगळं लिहिण्याचं कारण, राजापूरच्या पुराच्या बातम्या ! राजापूर शहरात मोठा पूर, घरांच्या आणि दुकानांच्या छपरांना पाणी लागले तर काही बुडाली. अंगावर काटा आणणारी दृष्ये ! खरेही आहे ते ! पण राजापूरचे राजे मात्र हा राजापूरचा पूरही राजासारखाच एन्जाॅय करतात.

आता किती पाऊस पडतोय, पाण्याचा जोर किती आहे, खर्लीवरच्या पाण्याचा जोर काय आणि अर्जुना कशी वाहतेयं, यावर आमचे अंदाज ठाम असतात. राजापूर शहरातल्या बाजारपेठ भागातील म्हणण्यापेक्षा पूररेषेच्या टप्प्यात येणारी सर्व घरे दुमजलीच ! त्यामुळे यावेळी किती सामान वर टाकायचे आणि त्या दुमजल्या वरच्या पोटमाळ्यावर किती टाकायचे याचे परफेक्ट नियोजन आम्ही आधीच करतो आणि मग पूर मस्त एन्जाॅय करतो. आमच्या नगर परिषदेचे कार्यालयच पुराच्या पाण्यात असते. नगर परिषदेच्या इमारतीचा तळमजला पाण्याखाली असतो. मग सांगा आता तुम्हीच, आम्ही करतो की नाही एन्जाॅय !

वर्षाच्या बाराही महिने आमच्या गाड्या नदीपात्रात आणि नदीच्या काठावर पार्क केलेल्या असतात कारण आमच्याकडे पार्किंग नाही. नदी आणि नदीपात्र हेच आमचं पार्किंग ! पण कधीही रात्री-अपरात्री आणि कितीही मोठा पूर आला तरी आमच्या गाड्याही एकदम सुरक्षितस्थळी दाखल झालेल्या असतात. खरं सांगू इंटरनेटवर जेवढ्या वेगात एखादी बातमी पसरत नाही ना त्यापेक्षा वेगात आमच्याकडे, पाणी भरतयं !

अरे हो ! या पुराची अजून एक गम्मत सांगायची आहे तुम्हाला, राहूनच गेलं. आमच्याकडे कितीही पूर आला ना तरी पूर ओसरल्याच्या दुसऱ्या मिनिटाला तुम्ही आमच्याकडे आलात यर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल. खरंच इथे पुराचे पाणी भरले होते? अहो, चिखल काढण्यातही आम्ही माहीर आहोत हं ! दुसऱ्या मिनिटाला आमचं घर चकचकीत असतं बघा. म्हणून म्हटलं, आम्ही चिखल काढण्यात माहीर आहोत ! या कधीतरी तुम्हीही आमच्यासोबत, राजापूरचा पूर मस्त एन्जाॅय करायला !

- विनाेद पवार, राजापूर

Web Title: Enjoy the flood of Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.