लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सात वर्षांपूर्वी १५ जून २०१४ रोजी येथील महर्षी कर्वे भाजी मंडईचे लोकार्पण झाले. त्यानंतर आठ ते नऊवेळा गाळे व ओट्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, वाढीव दरामुळे प्रतिसाद मिळाला नाही. आता अनामत रकमेवरील व्याजाची रक्कम रद्द करत मूल्यांकनातही घट झाली आहे. वर्षभरात लिलाव प्रक्रिया न राबविल्यामुळे या मंडईतील गाळे व ओटे बंदच आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून अवाढव्य मूल्यांकनामुळे व अनामत रकमेवरील ८ टक्के व्याजदारामुळे भाजी मंडई बंद राहिली आहे. त्यामुळे सहा वर्षांनंतर भाजी मंडई खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्रिसदस्यीय समितीने नव्याने सादर केलेल्या मूल्यांकनात गाळे व ओट्यांचे भाडे निम्म्याहून कमी तर ना परतावा रक्कम दरही घसरल्याने हे मूल्यांकन मान्य असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. आता निर्णयाला वर्ष होऊन गेले. मात्र, अद्याप निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. जिल्हाधिकारी, नगररचना अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या त्रिसदस्य समितीने भाजी मंडईच्या मूल्यांकनाचा अहवाल सादर केला होता. मंडईतील ५२ ओटे व ५४ गाळ्यांसाठी हे मूल्यांकन असून, पूर्वी गाळ्यांसाठी ६,५०० इतके मासिक भाडे होते. मात्र, आता नव्या मूल्यांकनानुसार १,५२६ रुपये तर ओट्यासाठी केवळ ७०० रूपये मासिक भाडे राहणार आहे. त्याशिवाय अनामत रकमेवर असलेली व्याजाची अट रद्द करून तेही मूल्यांकन कमी करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षांच्या कालावधीकरिता गाळ्यासाठी ३ लाख ६६ हजार ना परतावा, तर ओट्यासाठी १५ हजार रुपये परतावा रक्कम आकारली जाणार आहे.
------------------------
भाजी विक्रेते आजही रस्त्यावर
भाजी मंडईची इमारत तोडल्यानंतर भाजी व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था स्वतःहून करावी लागली. यातील बहुतांशी विक्रेते बाजारपेठेतील पानगल्ली परिसरात स्थलांतरित झाले तर काहीजण शहरातील इतर भागात स्थलांतरित झाले. त्याचवेळी काही विक्रेत्यांनी रस्त्यावरच भाजी विक्री सुरु केली. त्यांनतर आजतागायत जैसे थे परिस्थिती आहे.
-----------------------------
आठवेळा निविदा प्रक्रिया
यापूर्वीच्या मूल्यांकनानुसार नगर परिषदने आठवेळा निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, त्याला व्यापारी व विक्रेत्यांचा जराही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नगर परिषदने पानगल्ली व बाजारपेठेत रस्त्यालगत भाजी विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. तरीही व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेला जराही प्रतिसाद दिलेला नाही.
-------------------
नवीन मूल्यांकनानुसार भाडेदरात व अनामत रकमेत घट झाली आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काहीशी लिलाव प्रक्रिया लांबली. मात्र, आता लवकरच लिलाव जाहीर होणार आहे. ऑनलाईन स्वरूपात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- अनिल राजेशिर्के, मालमत्ता विभागप्रमुख, चिपळूण नगर परिषद