चिपळूण : तालुक्यातील मांडकी बुद्रुक येथील तब्बल ८५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. हॉटस्पॉट ठरलेल्या या गावात कोरोनामुळे हाहाकार उडाला होता. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण गावातील लोकांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रसंग उद्भवला होता. मात्र, आता ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार सुरू झाल्याने कोरोनाचा धोका कमी झाला आहे.
सावर्डे विभागातील मांडकी बुद्रुक येथील बौद्धवाडीतील तिघांचा अचानक मृत्यू झाला. यावेळी कोरोनाचा संशय आल्याने त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता काहीजण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या मदतीने गांभीर्याने लक्ष घातले. संपूर्ण गावातील ग्रामस्थ, महिला व मुलांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीतून तब्बल ८५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. याविषयी आमदार शेखर निकम यांनी लक्ष घालत वहाळ फाटा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल केले. तसेच ८ ते १० जणांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयांत उपचार केले, तर एकाची प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. आता वहाळ फाटा कोरोना केअर सेंटरमधील सर्वांना घरी सोडण्यात आले आहे, तर कामथे उपजिल्हा रुग्णालयात अवघे तिघेजण उपचार घेत आहेत.
.................................
एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आरोग्य विभागाने वेळीच उपचार व उपाययोजना सुरू केल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यासाठी आमदार शेखर निकम यांचे सहकार्यही मोलाचे ठरले आहे. आता दोन, तीनजण उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सुधारली आहे.
- अनंत खांबे, सरपंच, मांडकी बुद्रुक, ता. चिपळूण