दापोली/शिवाजी गोरे : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ८० रुपये किलो ते दीडशे रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये भाज्या विकल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दापोली तालुक्यात भाजी मार्केटमध्ये दिवसाला सुमारे १० ते १२ टन भाजी येते. परंतु, सध्या मात्र ही आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे दर वाढलेले आहेत. दापोली बाजारपेठेत फ्लावर, वांगे, गवार, काकडी, गाजर ८० रुपये किलो दराने मिळत आहेत, तर पावटा, मटार या भाज्यांनी शंभरी पार केली आहे. एकीकडे सर्वच मालाचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे भाजीपालाही महाग झाला आहे. त्यामुळे महिलांना घर चालविताना चांगलीच काटकसर करावी लागत आहे. काेराेनामुळे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशा आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत.
कोकणात बहुतेक भाज्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. परंतु, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आलेल्या महापुराने संपूर्ण पीक पाण्याखाली जाऊन कुजले आहे. या पुराचा फटका पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून होणारी भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. दापोली तालुक्यात सर्वच भाज्या जादा दराने विकल्या जात आहेत. महापुरामुळे ही कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने त्याचा परिणाम कोकणातील भाजी मार्केटवर झाला आहे.