राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी आगळावेगळा उत्सव; उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यातील नियोजन
By मनोज मुळ्ये | Published: January 14, 2024 05:47 PM2024-01-14T17:47:16+5:302024-01-14T17:47:30+5:30
हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक सोहळा असल्याने सर्व लोकांनीही आपल्या घरासमोर गुढी उभारावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
रत्नागिरी : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असताना जिल्ह्यातही हा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात १९६ राम मंदिरे असून, तेथे विद्युत रोषणाईसह गुढी उभारली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक कलावंतांचा गीतरामायण कार्यक्रम केला जाणार आहे आणि जिल्ह्यात सर्वत्र सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूकही काढली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महायुतीतर्फे पालकमंत्री सामंत, आमदार योगेश कदम, किरण तथा भैय्या सामंत, भाजपचे प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील राम मंदिरांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी २२ रोजीच्या नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात १९६ राम मंदिरे आहेत. दि. २२ रोजी या सर्व मंदिरांमध्ये प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला जाणार आहे. २१ पासूनच सर्वत्र रोषणाई केली जाईल. रत्नागिरीतील प्रमुख राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. २२ रोजी अयोध्येत होणारा सोहळा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवण्याची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यान ४६६३ ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. त्यावरही यानिमित्त रोषणाई केली जाणार आहे. प्रत्येक राम मंदिराबाहेर गुढी उभारली जाणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक सोहळा असल्याने सर्व लोकांनीही आपल्या घरासमोर गुढी उभारावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
२२ रोजी जिल्ह्यात सर्व ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्याचा प्रमुख कार्यक्रम म्हणून रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता तेथे फटाक्यांची आतषबाजीही केली जाणार आहे. अनेक राम मंदिरांमध्ये आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वच कार्यक्रमांसाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यात असतील, असेही ते म्हणाले.
१९६ मंदिरांमध्ये गीतरामायण
स्थानिक कलाकारांना सोबत घेत जिल्ह्यातील सर्व राम मंदिरांमध्ये गीत रामायण कार्यक्रम करण्याची सूचना प्रमोद जठार यांनी बैठकीत मांडली. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
प्रतिष्ठापना होताना जिल्ह्यात घंटानाद होणार
दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. १ मिनीट २३ संकेद हा मुहुर्त असून, त्यावेळी जिल्ह्यात सर्वत्र घंटानाद केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.