हक्काच्या आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार : प्रसाद लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:29+5:302021-06-02T04:24:29+5:30
राजापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले ...
राजापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे आज मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र संताप आहे. मराठा समाज बांधव म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा आमच्या हक्काच्या आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार आहे. त्यामुळे आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने योग्य प्रकारे बाजू मांडावी, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी राजापुरात मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. हॉटेल गुरूमाऊली येथील सभागृहात झालेल्या या छोटेखानी बैठकीप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, मराठा समाज सेवा संघ, राजापूरच्या महिला पदाधिकारी धनश्री मोरे उपस्थित होते.
यावेळी आमदार लाड यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी घेण्यात आलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती दिली. मात्र, उच्च न्यायालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने योग्य प्रकारे व भक्कमपणे बाजू न मांडल्याने आरक्षण रद्द झाले. त्याचा फटका मराठा समाजाला बसला आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र संताप आहे. युवक, युवतींमध्ये नैराश्य आहे. हे लक्षात घेऊन आज मराठा समाज बांधवांनी संघटीतपणे एकत्र येऊन यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने लढा दिला पाहिजे, असे लाड यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करेपर्यंत मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती द्यावी, सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी द्यावा, ही आमची मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. यावेळी धनश्री मोरे, विनायक कदम यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार अॅड. सुशांत पवार यांनी मानले.
या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मराठा समाज सेवा संघाचे विनायक सावंत, संजय ओगले, नरेंद्र मोहिते, महेश विचारे, प्रकाश ढवळे, दीपक नाटेकर, सुहास शिंदे, दिलीप पवार, जितेंद्र विचारे, अशोक कदम यांच्यासह मराठा समाज सेवा संघाचे पदाधिकारी, मराठा बांधव व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------
राजापूर येथे मराठा समाज बांधवांच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. दीपक पटवर्धन, अभिजीत गुरव, धनश्री मोरे उपस्थित हाेते.