राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये जमिनींच्या झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारासंबंधित शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पार पडलेल्या चौकशीमध्ये एकूण ८ गावातूंन ६३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये साखर गावातून सर्वाधिक ३५ तक्रारींचा सामावेश आहे तर सहा गावांतून एकही तक्रार दाखल झालेली नाही.
शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत तक्रारी नोंदविण्याबाबत जमीन मालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत जमिनींच्या खरेदी - विक्री व्यवहार प्रकरणात परप्रांतीय जमीन खरेदीदारांकडून मूळ जमीन मालक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे जोरदार आरोप करण्यात आले हाेते. त्यानुसार शासनाने रिफायनरी प्रकल्पांतर्गत झालेल्या व्यवहारप्रकरणी आर्थिक फसवणूक झालेल्या स्थानिक जमीन मालक शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजांमध्ये तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन केले होते. त्यानुसार तक्रारी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
३१ मार्चपर्यंत तक्रारींसाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार रिफायनरी प्रकल्प क्षेत्रातील एकूण १४ गावांपैकी आठ गावांमधून एकूण ६३ तक्रारींची नोंद झाली आहे. शासनाने नाणार परिसरातील जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. बुधवारी (३१ मार्च) चौकशीची मुदत संपली. त्यानुसार प्रकल्प परिसरातील चौदा गावांपैकी आठ गावांतून ६३ तक्रारींची नोंद झाली आहे, अशी माहिती येथील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
चाैकट
त्यामध्ये सर्वाधिक ३५ तक्रारी साखर गावातून नोंदविण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त विलये ६,चौके २, उपळे ७, तारळ ७, कात्रादेवी ३, नाणार १, गोठीवरे २ यांचा समावेश आहे. तर कार्शिंगेवाडी दत्तवाडी, पाळेकरवाडी, पडवे, कारिवणे, सागवे अशा सहा गावांतून एकाही तक्रारीची नोंद झालेली नाही.