रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे उपाहारगृह आणि बिअरबार परमिट रूमचा परवाना चालविण्यास घेतला. या व्यवहारातील सुमारे १० लाख रुपयांपैकी केवळ ३ लाख ४५ हजार ३२५ रुपये देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात बाणकोट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मार्च २०१९ ते २ मार्च २०२० या कालावधीत घडली आहे.
संदीप बाळकृष्ण जाधव (रा. खरवते, ता. दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरोधात अनंत कृष्णा शिंदे (५०, रा. देव्हारे, ता. मंडणगड) यांनी बुधवारी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, अनंत शिंदे यांचे देव्हारे येथे मंथन नावाचे उपाहारगृह आणि बिअरबार आहे. ते त्यांनी संदीप जाधवला १० लाख ९३ हजार ६६ रुपये या रकमेप्रमाणे चालवण्यास दिले होते. संदीपने त्यातील फक्त ३ लाख ४५ हजार ३२५ रुपये अनंत शिंदे यांना देऊन उर्वरित ७ लाख ४७ हजार ७४१ रुपये देण्यास टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलीस करत आहेत.