रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर आगीचे तांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 08:53 AM2020-05-16T08:53:13+5:302020-05-16T08:53:34+5:30
आगीचे नेमके कारण कळू शकले नसून आगीत लाखोंची हानी झाली आहे.
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरावर शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान आगीचे तांडव पाहायला मिळाले. बंदरावरील दोन झोपड्यांना अचानक आग लागून आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत जेटीवरील २ झोपड्या आणि १ टेम्पो जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण कळू शकले नसून आगीत लाखोंची हानी झाली आहे.
जेटीवर मासेमारी बोटीचे साहित्य ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन झोपड्याना अचानक आग लागली. या आगीने बघता बघता उग्ररूप धारण केले. अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि आगीत दोन्ही झोपड्या जळून बेचिराख झाल्या. याशिवाय एक टेम्पो आणि झोपडीत ठेवण्यात आलेले बोटीचे साहित्य देखील जळाले. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला हाेता. मात्र, साेसाट्याच्या वाऱ्यामुळे आग आटाेक्यात आणणे कठीण झाले हाेते.