‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमात आगवेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:31 AM2021-03-31T04:31:58+5:302021-03-31T04:31:58+5:30
चिपळूण : शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात ...
चिपळूण : शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. गेल्या वर्षभरात कोरोनास वेशीवरच रोखणाऱ्या आगवे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला तर संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे द्वितीय आणि चिपळूण तालुक्यातील वालोटी ग्रामपंचायत तृतीय ठरली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना रोख बक्षिसे देऊन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला होता. यात शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले होते. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत केलेले गावातील सर्वेक्षण, कोरोनाची चाचणी, गावासाठी विविध सेवाभावी संस्था, कंपन्यांचा सीएसआर फंड आदीतून मिळविलेला निधी वा साहित्य, कोरोनामुळे झालेला मृत्यू, सारीचे रुग्ण आदींवर आधारित प्रथम तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात आमदार शेखर निकम यांच्या आगवे गावाने प्रथम क्रमांक मिळविला.
माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यामुळे आगवेमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण मिळाला नव्हता.
अंगणवाडी सेविका सीमा हुमणे, वैशाली गावणंग, शशिकला लिबे, आशा सेविका अर्चना मोहिते, पूजा हुमणे, स्वयंसेवक रसिका लिबे, अभिषेक जाधव यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे गेल्या वर्षभरात आगवेत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. चिपळूण तालुक्यातील वालोटी आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे गावाने चोख कामागिरी बजावल्याने त्यांची पारितोषिकासाठी निवड झाली. सोमवारी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. विजेत्या तिन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजाराची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
आगवेच्या सरपंच सोनाली चव्हाण, उपसररपंच अनिकेत भंडारी, ग्रामसेवक श्रीधर भागवत यांच्यासह आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांनी पारितोषिक स्वीकारले. यावेळी प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, बीडीओ प्रशांत राऊत, सभापती पाडुरंग माळी, माजी सभापती धनश्री शिंदे, पूजा निकम, कामथेचे अधीक्षक डॉ. अजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
........................
फोटो- आगवे ग्रामपंचायत पुरस्कार स्वीकारताना.