लांजा : तालुक्यातील पन्हळे येथील २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लघु धरणाला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये गळती सुरू झाली होती. या धरणाचे काम सुरु असून, मंगळवारी प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी धरणाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे.
या धरणाचा धोका टळला आहे अशी माहिती रत्नागिरी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संजय नलावडे यांनी दिली आहे.
पन्हळे येथे बांधण्यात आलेल्या लघु धरणातून गेल्यावर्षी दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता धरणातून गढूळ पाण्याचा मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचे जोशी व गुरव वाडीतील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर पंचायत समिती सदस्य अनिल कसबळे यांनी रत्नागिरी पाटबंधारे विभागाला यांची माहिती दिली. त्यानुसार पाटबंधारे विभाग रत्नागिरीचे शाखा अभियंता संजय नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे यांनी रात्री ९.३० वाजता पन्हळे धरणाला भेट देऊन पाहणी केली. पन्हळे धरणातून गळती होत असली तरी ग्रामस्थांना कोणतीही घाबरण्याचे कारण नाही असा धीर देण्यात आला होता.
पन्हळे धरण हे लांजा लघु पाटबंधारे विभागाकडे देखभालीसाठी होते. दोन वर्षापूर्वी ते रत्नागिरी पाटबंधारे विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. धरणाला सातत्याने होणारी पाण्याची गळती पाहता धरणाच्या डागडुजीची मागणी येथील नागरिकांनी केली होती. त्याला शासनाने हिरवा कंदील देत १ कोटीचे अंदाज पत्रक मंजूर केले होते. त्यानुसार पन्हळे धरणाच्या सध्या सांडव्याच्या पक्ष भिंतीच्या मजबूती करणाचे काम सुरु आहे. ज्या ठिकाणी भगदाड पडून चिखलयुक्त पाण्याचा निचरा होत होता त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच जॅकवेल विहिरीचे कामही करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी पन्हळे धरणाचे काम कुठपर्यंत आले आहे याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे, लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांनी रत्नागिरी पाटबंधाऱ्याचे उपविभागीय अधिकारी संजय नलावडे, स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक एस. के. इंगळे यांच्याकडून धरणाच्या कामाची माहिती घेतली.
सध्या पन्हळे धरणाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. मात्र, खबरदारी म्हणून सध्या पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणामध्ये अडवण्यात येणार नाही. परंतु, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून पाहणी केली जाणार आहे, असे रत्नागिरी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संजय नलावडे यांनी दिली आहे.
---------------------
लांजा तालुक्यातील पन्हळे धरणाची लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे, लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांनी पाहणी केली़