रत्नागिरी: रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कोंडगाव (साखरपा). अंदाजे ५००० लोकवस्तीच्या या गावाजवळून 'काजळी नदी‘ रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाच्या जीवनदायिनीचा प्रवाह जातो. या नदीच्या काठावरच हे गाव वसले आहे. गावाची बाजारपेठदेखील नदीपात्राला समांतर आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वीपर्यंत पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे हे गाव आता डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या प्रश्नाला तोंड देत होते. जोडीला पावसाळ्यातील महापूर व त्यामुळे होणारे नुकसान अशा दुहेरी कात्रीत अडकलेले होते; मात्र त्यावरही सरदेशपांडे परिवाराने ग्रामस्थांच्या मदतीने उपाय शोधला. यंदा पहिल्या टप्प्यात काजळी नदीतील गाळ उपसा झाल्याने यावर्षी हे गाव पूरमुक्त राहिले.
साधारण ५ ते ६ वर्षांपूर्वी मूळचे कोंडगाव (साखरपा) येथीलच मात्र नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने चिंचवड, पुणे येथे वास्तव्यास असणारे प्रसाद सरदेशपांडे व मुग्धा प्रसाद सरदेशपांडे यांनी या दुहेरी संकटावरती उपाय शोधण्याचा ध्यास घेऊन, ग्रामस्थांच्या मदतीने कामाला सुरुवात केली. सलग तीन ते चार वर्षे याबाबत विविध स्तरावरती, विविध लोकांना भेटून, जलसंवर्धनाच्या कामात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन घेतले. या समस्येचे मूळ हे नदीपात्रात वर्षानुवर्षे साठलेला गाळ व त्यामुळे उथळ झालेले नदीपात्र हेच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर खऱ्या अर्थाने अभियानाला सुरुवात झाली. आवश्यक त्या शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोंडगाव येथील श्री दत्त देवस्थान या संस्थेची भक्कम साथ प्रसाद सरदेशपांडे यांना मिळाली. विविध शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत, कोंडगावचे सरपंच, सर्व सदस्य व कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले.
२०१९ सालाच्या सुरुवातीला गाळ उपसा कामासाठी रत्नागिरीतील पाटबंधारे विभाग तसेच अन्य आवश्यक त्या खात्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाने वेग घेतला. दरम्यान, या कामासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक संबंधित यंत्रणेने तयार केले. काही प्रमाणात अर्थ सहाय्य करण्याचे आश्वासन तत्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी दिले; मात्र काही कारणांमुळे २०१९ मध्ये या कामास सुरुवात झाली नाही; मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू झाले; परंतु याचवेळी कोरोनाचा अडसर निर्माण झाला. शासकीय स्तरावरून मिळणारे सहाय्य महामारीमुळे मिळण्याची आशा जवळ जवळ संपुष्टात आली. याचवेळी संस्थेला श्रीधर कबनुरकर यांच्या रूपाने मार्ग दाखवणारा वाटाड्या मिळाला. त्यांनी सामाजिक व व्यावसायिक हितसंबंधांचा वापर करून जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्रात अनमोल योगदान देणाऱ्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनशी संपर्क केला. अनेक वर्षांपासूनची संस्थेची धडपड लक्षात घेऊन नाम फाउंडेशनने लगेचच कामासाठी विनामोबदला यंत्र सामग्री देण्याचे मान्य केले. मात्र ही यंत्र सामग्री चालवण्यासाठी लागणारे इंधन, कर्मचारी भोजन-निवास आदी खर्च ग्रामस्थांनी करावा, अशी अट ठेवली.
ग्रामस्थांच्या सहकार्यावर आत्मविश्वास ठेवून श्री दत्त देवस्थानने, श्री दत्तसेवा पतसंस्था व ग्रुप ग्रामपंचायत, कोंडगाव यांच्या सहकार्याने लोकसहभागाच्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी शुभारंभ नाम फाउंडेशनचे समन्वयक मल्हार पाटेकर, इंद्रजित देशमुख तसेच नाम फाउंडेशनशी संबंधित अन्य व्यक्ती आणि या विषयाशी संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झाला. साडेतीन महिन्याच्या काळात सुमारे १२-१४ तास अविरत यंत्र सामग्रीच्या सहाय्याने काम करून १ किमी लांब, ६० मी रुंद व ४-५ मीटर खोल अशा पद्धतीने नदीतील गाळ उपसून किनाऱ्यावर व्यवस्थित बसवला गेला.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक भागाला पुराचा तडाखा बसला होता; मात्र या अतिवृष्टीतही कोंडगाव परिसर पूरमुक्त राहिला. किरकोळ पडझड वगळता कोंडगाववासीयांचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, हीच केलेल्या दर्जेदार कामाची पोचपावती आहे.
.....................................
३० लाख रुपये केवळ लोकसहभागातून....
केवळ पहिल्या टप्प्याच्या कामासाठी झालेला सुमारे ३० लाख रुपये इतका खर्च केवळ लोकसहभागातून मिळालेल्या देणगीतून उभारला गेला. आतापर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. कोंडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही मदत मिळविण्यासाठी श्री दत्त देवस्थान शासकीय दरबारी प्रयत्न करीत आहे.