रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटीवर लाखाे रुपये खर्चून बांधण्यात आलेले मच्छी मार्केट ओस पडले आहे. याठिकाणी मच्छी विक्री न करता जेटीवर बसूनच मच्छी विक्री केली जात आहे. या प्रकाराची मत्स्य विभागाने गंभीर दखल घेतली असून, मंगळवारपासून जेटीवर मच्छी विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची सक्त सूचना दिली आहे. याबाबत साेमवारी मत्स्य विभागाकडून रिक्षा फिरवून सूचना देण्यात आल्या.रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर हे मच्छी विक्रीचे महत्त्वाचे बंदर आहे. याठिकाणी लाखाे रुपयांची उलाढाल हाेत असते. मात्र, येथील मच्छी विक्रेत्या महिला जेटीवरच बसून मच्छी विक्री करत असल्याने जेटीवर रहदारीचा प्रश्न उद्भवताे. गाड्यांना मच्छी वाहतूक करताना अडचणी निर्माण हाेतात. त्यामुळे महिला मच्छी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी मच्छी विक्री करावी म्हणून मत्स्य विभागाकडून सुमारे लाखो रुपये खर्च करून मिरकरवाडा येथे मच्छी मार्केट बांधण्यात आले आहे. मात्र, अद्यापही महिला जेटीवरच मच्छी विक्री करत आहेत. त्यामुळे नव्याने बांधलेले मच्छी मार्केट ओस पडले आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेत साेमवारी मत्स्य विभागाने मिरकरवाडा जेटीवर रिक्षा फिरवून येथील मच्छी विक्रेत्यांना शेवटचा इशारा दिला आहे. मच्छी विक्रेत्या महिलांनी मंगळवारपासून जेटीवर बसून मच्छी विक्री न करता नव्याने बांधलेल्या मच्छी मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करावी. तसे न केल्यास विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिकांची बैठकयाबाबत रविवारी मिरकरवाडा येथील स्थानिक माजी नगरसेवक व मिरकरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत एक बैठक घेण्यात आली. यावेळी नव्याने बांधलेल्या मच्छी मार्केटमध्ये बसून व्यवसाय करण्याचे आवाहन करण्यात आले. याठिकाणी लवकरच वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी ठरले.
वादामुळे मच्छी मार्केट वापराविनाजेटीवरील महिला मच्छीमारांमध्ये दोन संघटना तयार झाल्या आहेत. एक संघटना मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री करण्यासाठी तयार आहे. तर दुसरी संघटना मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री करण्यास तयार नसल्याचे समाेर आले आहे. या वादामुळे नवीन मच्छी मार्केट वापराविना पडून राहिले आहे.