पावसाळ्याच्या तयारीवर परिणाम
रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची लोक अगोदरच तयारी करतात. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव असल्याने त्याचा परिणाम या तयारीवर झाल्याचे दिसून येत. पावसाळ्यापूर्वी तयारी करताना मसाले, सुकलेले मासे तसेच अन्य पदार्थ बनवून ठेवले जातात. मात्र, कोरोनामुळे अनेक लोक ही तयारी करू शकलेले नाहीत.
महावितरणची कौतुकास्पद कामगिरी
चिपळूण : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महावितरणला तौक्ते चक्रीवादळाने मोठा फटका दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेक गावांमध्ये झाडांसह विद्युत खांबांची पडझड झाल्याने गावे, वाड्या अंधारमय झाल्या होत्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करून वीजपुरवठा सुरू केला.
मच्छिमारांचे कोट्यवधींचे नुकसान
राजापूर : तौक्ते वादळानंतर यास चक्रीवादळाचा परिणामही मासेमारीवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजूनही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार, उंच लाटा उसळत असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी करणे अजूनही बंद ठेवली आहे. मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजीवड्यात मोहल्ला क्लिनिक सुरू
रत्नागिरी : शहरातील गजबजलेली लोकवस्ती असलेल्या राजीवडा गावामध्ये कोअर कमिटीने माेहल्ला क्लिनिक सुरू केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोअर कमिटीने मोहल्ला क्लिनिकची स्थापना करून अनेकांचा जीव वाचविला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या लाटेतही पोलिसांच्या सहकार्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
रस्ता खोदाईमुळे अपघात
रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला तरी शहर परिसरात नगरपरिषदेकडून खोदाईची कामे कमी झालेली नाहीत. ती कामे अजूनही सुरूच आहेत. शहरातील सन्मित्रनगर ते उद्यमनगरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन लोक जखमी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ठेकेदाराचे दुर्लक्ष
रत्नागिरी : शहरात ठिकठिकाणी पाईप टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर ते चर डांबरीकरण करून बुजविण्यात आले. मात्र, चर बुजविल्यानंतर ठेकेदाराकडून रस्त्यावर पडलेल्या खडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाईच्या मागणीचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
रोजगारच गेल्याने हाल
रत्नागिरी : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांचे व्यवसायही बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगारच गेल्याने त्यांना दोनवेळचे जेवणही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.