दापोली : आंजर्ले खाडीतील अडखळ, सारंग या ठिकाणाहून ६१ लाख ६० हजार रुपये किमतीची १ हजार ५४० ब्रास वाळू चोरीला गेल्याचा अंदाज करत आंजर्लेचे मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे़ या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी ५ संशयितांना गुरुवारी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्या आदेशाने निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर, आंजर्लेचे मंडल अधिकारी सुधीर पारदुले, दापोलीचे मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर, आंजर्लेचे तलाठी उत्तम पाटील, गिम्हवणेचे तलाठी गुरुदत्त लोहार, अडखळचे तलाठी आदित्य हिरेमठ, ताडीलचे तलाठी साईनाथ मिरासे, दापोलीचे तलाठी दीपक पवार, हर्णैचे बंदर निरीक्षक गवारे यांच्या पथकाने २२ एप्रिलला आंजर्ले खाडीत होडीने जाऊन म्हैसोंडे पाटीलवाडी येथे उतरून पाहणी केली हाेती़
मौजे अडखळ येथील सर्व्हे नंबर २२/१०४ येथे संशयित रिझवान काझी यांनी अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करून १९ लाख २० हजार रुपये किमतीची सुमारे ४८० ब्रास वाळू , सर्व्हे नंबर ३५/१ व ३४/३ मध्ये संशयित दिनेश यशवंत कदम यांनीही अनधिकृत वाळू उत्खननाचा प्लॉट तयार करून १३ लाख रुपये किमतीची ३२५ ब्रास वाळू, सर्व्हे नंबर ३७/४ मध्ये संशयित बिलाल काझी यांनी १६ लाख रुपये किमतीची ४०० ब्रास वाळू, सर्व्हे नंबर ३७/५ मध्ये संशयित अकबर काझी यांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीची ६० ब्रास वाळू, मौजे सारंग येथील सर्व्हे नंबर २६/१ येथे संशयित गुलाम हमदुले यांनी ११ लाख रुपये किमतीची २७५ ब्रास वाळू चोरी केल्याचा अंदाज तेथे असलेल्या खडशाच्या साठ्यावरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
वाळू चोरीचा हा अंदाज व्यक्त करून मंडल अधिकारी सुधीर पारदुले व मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी प्रत्येक ठिकाणचे पंचनामे केले होते. आंजर्लेचे प्रभारी मंडल अधिकारी सुधीर पारदुले यांनी दापोली पोलीस स्थानकात वाळूचे उत्खनन करून चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ५ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.