चिपळूण : शहरातून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडीला कामथे घाटात समोरून येणाऱ्या मोठ्या भारत बेन या वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून, इनोव्हा गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता झाला. याप्रकरणी भारत बेन गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण मार्कंडी येथील अब्दुल लतीफ कादिर खतीब हे आपल्या इनोव्हा गाडीतून मार्कंडी येथील नातेवाइकांना घेऊन संगमेश्वरला जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात इनोव्हा आली असता संगमेश्वरच्या दशेने भारत बेन नावाचे एक मोठे वाहन भरधाव वेगाने आले आणि त्याने इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात इनोव्हा चालक अब्दुल लतीफ कादिर खतीब, शाहीन अबुसाहेब मोडक, रशीद इसाक मोडक, दिलखशा सरफराज मोडक आणि समिया तौसिफ मोडक असे पाचजण जखमी झाले आहेत, तर इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याप्रकरणी इनोव्हा चालक अब्दुल लतीफ खतीब यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, त्यानुसार भारत बेन गाडी चालक कुशारसिंग केशरसिंग रजपूत (रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.