चिपळुणात पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत साडेतीन कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:08+5:302021-08-13T04:35:08+5:30
चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रत्येकी ५ हजारप्रमाणे शासकीय मदतीचे वाटप करण्याचे काम सुरू असून, अद्यापपर्यंत ६,८०५ पूरग्रस्तांना ...
चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रत्येकी ५ हजारप्रमाणे शासकीय मदतीचे वाटप करण्याचे काम सुरू असून, अद्यापपर्यंत ६,८०५ पूरग्रस्तांना एकूण ३ कोटी ४० लाख २५ हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. सरासरी ६५ टक्के वाटप पूर्ण झाले असून, अजून ३५ टक्के पूरग्रस्तांना मदतीचे वाटप होणे शिल्लक आहे.
२२ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे चिपळूणमध्ये अतोनात नुकसान झाले. शासकीय यंत्रणेने नुकसानाची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले. त्यानुसार चिपळुणात एकूण ११,८०५ पूरग्रस्तांची नोंद करण्यात आली असून, त्यांना प्रथम तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपयांचे वाटप करण्याचे काम चिपळूण तहसील कार्यालयातून सुरू करण्यात आले आहे. गेले चार दिवस हे काम येथील यंत्रणा करत आहे.
त्यानुसार बुधवारपर्यंत ११,८०५ पैकी ६,८०५ पूरग्रस्तांना प्रत्येकी ५ हजारप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख २५ हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे. सरासरी ६५ टक्के वाटप पूर्ण झाले असून, उर्वरित ३५ टक्के पूरग्रस्तांना लवकरच ही आर्थिक मदत पोहोच केली जाणार आहे. शासनाकडून ही तातडीची मदत देण्यात येत असून, पुढील आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पूरग्रस्तांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जात असले, तरी याबाबत पूरग्रस्तांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. शासनाने ५ हजार रुपये प्रथम भांडीकुंडी आणि कपडे यांच्यासाठी तर नंतर १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. परंतु, आता फक्त ५ हजार रुपयेच दिले जात असल्याने पुढील मदतीचे काय, असा प्रश्न पूरग्रस्तांकडून विचारला जात आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी महसूल यंत्रणेकडे नाही. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.