रत्नागिरी - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.
राजापुरातील अर्जुना व कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे. शाळा महाविद्यालये सोडून देण्यात आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षितस्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता शिवाजी पथ, मछीमार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.
उत्तर आणि दक्षिण कोकणात 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबई जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही पावसाचा काहीसा फटका बसेल, अशी शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने मुळा-मुठानदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. तसेच बाबा भिडे पुलालगत पाणी झाल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईदेखील पावसाचा जोर कायम असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 78 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरणही 100 टक्के भरलं आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागतील त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने आंबोली पूलावर पाणीच पाणी झालं आहे.
पाहा व्हिडीओ -