बंद दुकानांवर लक्ष अन् उघड्यावरील गर्दीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:23+5:302021-06-02T04:24:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी उत्तर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांशी ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी संवाद ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी उत्तर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांशी ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी कडक लॉकडाऊनला सहमती दर्शवत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मात्र, त्यासाठी बंद दुकानांवर अधिक भर न देता खुल्या बाजारात सुरू असलेली भाजी विक्री व अन्य व्यवसायांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली. तसेच औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कामगारांची संख्या कमी करण्याची मागणीही केली.
जिल्हा प्रशासनाने ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत काही व्यापाऱ्यांनी कडक लॉकडाऊनला सहमती दर्शवताना काही बदल सुचविले. विशेषतः बंद असलेल्या दुकानांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते. परंतु, उघडपणे भाजी व फळ विक्रेत्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेतली जात नाही. या पद्धतीने औद्योगिक वसाहतीत काही कंपन्या पूर्ण क्षमतेने चालविल्या जात आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. जे. के. फाईल सारख्या कंपनीत १०-१२ कामगारांचा मृत्यू होतो. मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नसेल, तर व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन का पाळावा, असे मत चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अरुण भोजने यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष शिरीष काटकर यांनी खासगी कंपन्यांनी शासनाच्या कार्यालयाप्रमाणे कर्मचारी संख्या कमी करून त्यांची राहण्याची व्यवस्था तिथेच करण्याची मागणी केली. त्यानंतर उदय ओतारी, किशोर रेडीज यांनीही काही मुद्दे मांडले. जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.