रत्नागिरी : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले.मुहम्मद पैगंबर यांची जयंती रविवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने दावते इस्लामी मदनी मरकज, फैजाने अत्तार कोकणनगर, दर्गा कमिटी, धनजीनाका यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकांचे आगमन मारूती मंदिर येथे झाले. त्यावेळी दोन्ही मिरवणुकांचे स्वागत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, सेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, अल्पसंख्याक कमिटीचे तालुकाध्यक्ष अल्ताफ संगमेश्वरी, रज्जाक काझी, अलिमियॉ काझी, शाखाप्रमुख शकील मोडक, नदीम सोलकर, शकील डिंगणकर, रमजान गोलंदाज, रिझवान मुजावर, अजिम चिकटे, सिकंदर खान, आसिफ अकबानी, बाबामियॉ मुकादम आदी उपस्थित होते. डॉ. मुंढे यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही मिरवणुकीतील मुस्लिम बांधवांचे स्वागत केले व ईद - ए - मिलाद निमित्ताने शुभेच्छा दिल्या.ईद - ए - मिलाद निमित्ताने गावोगावी मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये शनिवारपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुरआन तिलावत पठण, नात पठण यांसारख्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर मशिदीतून कुरआनखानी आयोजित करण्यात आली होती. पैगंबर जयंतीनिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी जुलूस (मिरवणुका) आयोजित करण्यात आल्या होत्या.रत्नागिरी शहरातील दर्गा कमिटी, धनजी नाका व कोकणनगर येथून जुलूस (मिरवणूका) चे आयोजन केले होते. कोकणनगर येथील दावते इस्लामी मदनी मरकज, फैजाने अत्तारतर्फे सालाबादप्रमाणे ईद - ए -मिलादनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी रात्री ईशा नमाजनंतर मरकजमध्ये सुन्नतो बहारा बयान (प्रवचन) करण्यात आल्यानंतर नाते मुस्तफा व रात्री सलाम सादर करण्यात आली. दावते इस्लामी मदनी मरकज, फैजाने अत्तारतर्फे कोकणनगर येथून जुलूसला प्रारंभ झाला. राजनगर, मेस्त्री व्हिला, गोडबोले स्टॉपमार्गे मारूती मंदिर ते उद्यमनगर व परत कोकणनगर मरकज येथे सांगता झाली.