शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेड शहरातील एस. टी. मैदानात जाहीर सभा होणार आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ही उद्धव ठाकरेंची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत ते कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खेडचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी एकनाथ शिंदेना साथ देत पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर उद्धव ठाकरे देणार का, हे पाहायचे आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या सभेआधीच रामदास कदम यांनी मोठी घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे आज ज्या ठिकाणी सभा घेताय, त्याच ठिकाणी १९ मार्च रोजी रामदास कदम यांची सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच आमच्या या सभेतून व्याज्यासह त्यांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे खेडमध्ये येतायत म्हणून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले आहे. यामध्ये खेडमधील २ टक्के देखील स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश नाही. रामदास कमदचा या लोकांनी किती दसका घेतलाय, हे यामधून दिसून येतंय. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नाही, असा टोलाही रामदास कदम यांनी यावेळी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी खेड शहरात करण्यात आली आहे. सर्व गजबजलेल्या ठिकाणी पक्ष प्रवेशाचे बॅनर उभारण्यात आले आहेत. तर दापोली ते भरणे मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले आहे. या सभेचे नियोजन आणि आढावा घेण्यासाठी माजी पालकमंत्री अॅड. अनिल परब, आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री अनंत गीते, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समवेत दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शुक्रवारी (३ मार्च) सभाही पार पडली. यावेळी अॅड. परब यांनी दापोली विधानसभा मतदार संघात पुढील आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असेल अशी तयारी या सभेची झाल्याचे सांगितले.
कमानी उभारल्या-
मुंबई गोवा महामार्गावर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर व झेंडे लावले आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाड नाका, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, एसटी बसस्थानक परिसरात कमानी उभारल्या.