पारंपरिक कोळी बांधवांच्या उपोषणस्थळी माजी आमदार संजय कदम यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 02:27 PM2021-03-25T14:27:16+5:302021-03-25T14:29:11+5:30
fisherman Ratnagiri-समुद्रात बेकायदेशीररीत्या होणारी एलईडी मासेमारी, पर्ससीन नौका याविरोधात दापोली, मंडणगड व गुहागर येथील पारंपरिक कोळी बांधवांनी सुरू केलेले साखळी उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या उपोषणाला माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले.
दापोली : समुद्रात बेकायदेशीररीत्या होणारी एलईडी मासेमारी, पर्ससीन नौका याविरोधात दापोली, मंडणगड व गुहागर येथील पारंपरिक कोळी बांधवांनी सुरू केलेले साखळी उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या उपोषणाला माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले.
पारंपरिक मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ८० ते ९० टक्के नौका बंदरामध्ये व खाड्यांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर मासेमारीला अभय देत शासनाकडून डोळेझाक होत असल्याने हायस्पीड व एलईडी मासेमारीच्या संख्येत वाढ होत आहे. त्याविरोधात दापोली मंडणगड- गुहागर मच्छीमार संघर्ष समितीकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विश्वास मुधोळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व दापोली नगर पंचायत नगरसेवक खालीद रखांगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, मंडणगड तालुकाध्यक्ष महेश कचावडे, दापोली तालुका अध्यक्ष नितीन साठे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मयूर मोहिते, पालगड गण अध्यक्ष योगेश महाडिक, गव्हे ग्रामपंचायत सदस्य पप्या जोशी, उमेश साटले, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर व पदाधिकाऱ्यांनी उपोषण करणाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे.
उध्दवसाहेब, आश्वासनाचे काय झाले
उद्धव साहेब तुम्ही पंधरा दिवसांत एलईडी मासेमारीच्या बोटी अरबी समुद्रात बुडविणार होतात. आपण दिलेल्या वचनाला आता दोन वर्षं पूर्ण होतील, परंतु एलईडी मासेमारी अजूनही राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे आपण दिलेल्या वचनाचा आपल्याला विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न हर्णै बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लोकसभेप्रसंगी दिले होते वचन
लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे हे अनंत गिते यांच्या प्रचारासाठी गुहागर येथे आले होते. त्याच वेळेस जाहीर सभेत त्यांनी कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना एलईडी मासेमारी पंधरा दिवसांत अरबी समुद्रात बुडवण्याचे वचन दिले होते. कोकणातील पारंपरिक मच्छीमार आजही शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. तुमचा मावळा असलेला हा पारंपरिक मच्छीमार समाज संकटात सापडला आहे, त्यांना तुम्ही कधी मदत करणार, असा प्रश्नही पावसे यांनी केला.