रस्त्याचे काम रखडले
रामपूर : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गताम्हाणे, उमरोली येथे सुरू आहे. पण मंदगतीने काम चालू आहे. मार्गताम्हाणे–सुतारवाडी पूल येथेही गेले दोन महिने काम सुरू आहे. नदीपात्रातून रस्ता काढल्याने नदीचा प्रवाह बदलण्याचा धोका निर्माण झाला असून त्याचा परिणाम उमरोली, चिवेली फाटा येथे होणार असल्याची चर्चा चालू आहे.
हनुमान जयंती साधेपणाने
रामपूर : परिसरात कोरोना प्रादुर्भावामुळे हनुमान जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न करता केवळ धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. देश व राज्यावरील कोरोनारूपी राक्षसाचे संकट दूर कर, असे साकडे हनुमानाच्याचरणी घालण्यात आले.
एस.टी. फेऱ्या मर्यादित
रामपूर : लॉकडाऊनचा काळ, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गुहागर-चिपळूण मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या बंद आहेत. गुहागर आगारातून सकाळी ६ वाजता, ७ वाजता, ८ वाजता, ९ वाजता, तसेच दुपारी ४ व संध्याकाळी ६ वाजता चिपळूणसाठी एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत, तर चिपळूण येथून गुहागरकडे सकाळी ८ वाजता, ९, १०, ११ वाजता, संध्याकाळी ८ वाजता व रात्री ८.३० वाजता एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत. गुहागरहून रत्नागिरीसाठी सकाळी ६.३० वाजता बस आहे.
कायमस्वरूपी रुग्णवाहिका हवी
रामपूर : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सुमारे २९ गावे येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राची २ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली अडीच कोटी रुपयांची इमारत आकर्षक बनली आहे. येथे या २९ गावांमधील रुग्णांची उपचारांसाठी नियमितपणे गर्दी असते. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाहिका उपलब्ध होणे गरजेचे आहे.
कोविड लसीचा तुटवडा
रामपूर : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा जाणवत आहे. सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी १०० जणांनीच लसीचा लाभ घेतला. २५० जणांना लस मिळाली नाही. बराच काळ तिष्ठत राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर परत जाण्याची नामुष्की आली.