लांजा : विद्युत पुरवठा कमी जास्त प्रमाणात झाल्याने फ्रीजचा स्फोट होऊन बंगल्यातील तीन खोल्यातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, फर्निचर, घरातील धान्य, कपडे असे १० लाख रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता लांजा शहरात घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.लांजा शहरातील आड या रस्त्यावर शासकीय ठेकेदार भिंगार्डे बंधूचा तीन मजली बंगला आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर प्रदीप सीताराम भिंगार्डे हे आपल्या पत्नीसह राहतात. शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने शहरातील विद्युत पुरवठा कमी जास्त प्रमाणात झाल्याने किचनमध्ये असलेल्या फ्रीजचा स्फोट झाला. या स्फोटात किचनमधील लाकडी साहित्याने पेट घेतला.
बेडरूममध्ये झोपलेल्या भारती भिंगार्डे यांना आवाज येताच त्यांनी किचनमध्ये जावून पाहिले असता त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी पती प्रदीप भिंगार्डे यांना माहिती दिली. त्यांनी प्रथम फ्रीजची वायर काढून चाणाक्षपणाने किचनमध्ये भरलेले दोन सिलेंडर घरातून बाहेर काढले.मात्र, एक सिलेंडर शेगडीला सुरु असल्याने तसेच आग वाढत असल्याने त्यांना घरातून बाहेर काढणे अवघड झाले. त्याचवेळी प्रदीप भिंगार्डे यांनी नगरसेवक मंगेश लांजेकर, पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रसाद जेधे, अस्लम बागवान, शिवा उकली, प्रसाद भाईशेट्ये, संतोष कोत्रे यांना मोबाईलवर संपर्क साधून बोलविण्यात आले. तरुणांनी घरामध्ये ट्राँलीवर असलेला सिलेंडर यशस्वीपणे बाहेर काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.भिंगार्डे यांच्या बंगल्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच शहरातील अनेकांनी धाव घेतली त्यांनी पाणी मारुन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या तिन्ही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्याचा वापर असल्याने आग एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये पसरली. खोलीमध्ये एसी सुरू असल्याने आग भडकली आणि तिसरी खोलीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.तीनही खोल्यांमधील किंमती फर्निचर, वायरिंग, एसी, कपाटे, कपडे, धान्य जळून खाक झाले. आग हळूहळू वाढत असल्याने जमलेल्या नागरिकांनी शहरातील रेस्ट हाऊस येथील पेट्रोलपंपमधील अग्नीशमकाचा वापर सुरू केला. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आण्यामध्ये नागरिकांना यश आले.