खेड : शहरानजीकच्या भोस्ते गावातील जलालशहाँ मोहल्ला येथे राहणारे नदीम सांगले आणि एका जंगली पोपटामध्ये तयार झालेल्या भावनिक नात्याची चर्चा सध्या खेडमध्ये सुरू आहे. मनुष्यप्राणी व जंगली पशु-पक्षांमध्ये असे नाते अभावानेच दिसून येते. भोस्ते येथील सांगले कुटुंबीयांचा एक सदस्य झालेला हा पोपट नदीम सांगले यांच्यासोबत ते घरात असताना सतत सावलीसारखा वावरत असतो. संध्याकाळी तो घरी परत येण्याच्या मार्गावर त्याची प्रतीक्षा करणारा हा पोपट कुतुलहलाचा विषय बनला आहे.खेड तालुक्यातील भोस्ते जलालशहाँ मोहल्ला येथील नदीम आदम सांगले हे विक्रीप्रतिनिधी म्हणून एका खाद्यतेलाच्या कंपनीत काम करतात. सन २०१५ मध्ये अखेरीस त्यांच्या घराभोवती कावळ्यांचा मोठा कोलाहल त्यांना ऐकायला मिळाला. घराबाहेर येऊन सांगले यांनी पाहिले असता कावळे एका पोपटाचा पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले.
घाबरलेल्या व जखमी झालेल्या या पोपटाने नदीम सांगले यांच्या अंगणात आसरा घेतला.नदीम यांनी क्षणाचा विलंब न करता जंगली पोपटाच्या मागे लागलेल्या कावळ्यांना हाकलून लावले आणि जखमी, घाबरलेल्या पोपटाला त्यांनी दाणा-पाणी देऊन प्रेमाने जवळ घेतले. मायेची उब मिळाल्यानंतर या पोपटाने काही दिवस नदीम यांच्या घरात वास्तव्य केले.
पूर्णत: बरे वाटल्यानंतर नदीम यांनी जंगली पोपटाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात तो उडून जावा, यासाठी प्रयत्न केले. परंतु त्या पोपटाने त्यांच्या घरासभोवती असलेल्या झाडांवरच आपला मुक्काम केला. तो गेली तीन वर्षे त्याच ठिकाणी राहत आहे. त्यांच्यामध्ये आता घट्ट मैत्री झाली आहे.नदीम सांगले सकाळी घरातील सर्व कामे आटोपून बाहेर निघेपर्यंत हा राघू यांच्या अंगाखांद्यावर बसून वावरत असतो. नदीम कामावर निघाले की, पोपट त्यांच्या दुचाकीवर बसून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जगबुडी नदीवरील पुलापर्यंत त्यांच्यासोबत जातो आणि परत घरी येतो. नदीम कामावर निघून गेल्यानंतर त्यांची मुलगी नसीमा हिच्यासोबत ती दुपारी शाळेत जाईपर्यंत तिच्याशी खेळतो.दुपारनंतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर झैनाब अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नदीम यांची बहीण शमा अलवी यांच्याकडे जातो. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नदीम घरी परत येत असताना त्यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जगबुडी नदीवरील पुलाजवळील झाडावर हा पोपट बसून वाट पहात असतो.
नदीम यांची दुचाकी दिसली की तो त्यांच्या गाडीवर येऊन बसतो व त्यांच्यासोबतच घरी येतो. नेहमी घरात राहणारा हा पोपट नदीम जेव्हा कामानिमित्त रात्रीचे दुसरीकडे वास्तव्याला जातात त्यारात्री घरानजीकच्या आंब्याच्या झाडावर मुक्काम करतो. नदीम आणि पोपटाची ही मैत्री चर्चेचा विषय ठरला आहे.