गणपतीपुळे /कसबा बावडा (कोल्हापूर) : कोल्हापुरातून पर्यटनासाठी आलेले तिघेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली. त्यातील दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील आंबेडकर नगर परिसरातील मछले कुटुंबीय पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. यातील तिघांचा आज सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास हे वृत्त बावडा परिसरात पसरताच आंबेडकर नगरात एकच शोककळा पसरली.
याबाबत समजलेली माहिती अशी, कोल्हापुरातील कसबा बावडा आंबेडकर नगर मधील जयसिंग मछले यांच्या कुटुंबीयातील दहाजण शुक्रवार दि.१६ रोजी सुट्टी निमित्त गणपतीपुळे येथे स्कॉर्पिओ गाडीने काल सकाळी ११ वाजता कसबा बावडा येथून पर्यटनासाठी गेले होते. आज सकाळी हे सर्व कुटुंबीय समुद्रामध्ये गेले असता मोठ्या लाटेच्या प्रवाहात यातील तिघेजण समुद्रात ओढले गेले.
मृतांमध्ये काजल रोहन मछले (वय १६), सुमन विशाल मछले (वय २४, दोघी राहणार आंबेडकर नगर, कसबा बावडा) तर जयसिंग मछले यांचे जावई राहुल अशोक बागडे (वय-३० राहणार गणेश नगर, हुबळी) यांचा समावेश आहे. यातील काजल मछले व सुमन मछले यांचा मृतदेह सकाळी सातच्या सुमारास तर राहुल बागडे यांचा मृतदेह दुपारी बाराच्या सुमारास मिळून आला.
या या घटनेचे वृत्त समजतात आंबेडकर नगर परिसरातील अनेक तरुण कार्यकर्ते व नातेवाईक तीन ते चार गाड्या करून ताबडतोब गणपतीपुळयाकडे रवाना झाले. यातील मृत राहुल बागडे हे रेल्वे मध्ये सेवेत होते. ते जयसिंग मछले यांचे जावई असुन हुबळी येथे रहातात. गेले काही महिन्यांपूर्वीच ते नोकरीत कायम झाले होते. चार वर्षांनी जावई सासरवाडीला आले म्हणून त्यांनी पर्यटनासाठी गणपतीपुळे सहल काढली होती.
या सहलीला कुटुंब प्रमुख जयसिंग मछले यांचा विरोध होता. जयसिंग मछले व त्यांचा लहान मुलगा सहलीला न जाता घरीच थांबले होते. या घटनेत वाचलेले पर्यटक किसन मछले, पुजा बागडे, निर्मला मछले, ऐश्वर्या मिनेकर या सर्वाना सुरक्षा रक्षक व जिव रक्षकांनी वाचवले.