सर्वसामान्य जनता मात्र वेठीस : रवींद्र नागरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:30+5:302021-04-20T04:33:30+5:30
राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड ...
राजापूर : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसून, शासन, प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक ती कोविड सेंटर, लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ बैठकांचा फार्स करून कोरोना नियंत्रणात येणार नाही, असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी लगावला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नावाखाली शासनाने कडक लॉकडाऊन करून जनतेची एकप्रकारे कोंडीच केली आहे. यात सामान्य जनता भरडली जात आहे. कामगारांचे रोजगार बुडत आहेत. त्यामुळे लोकांना उपाशीपोटी मरण्याची वेळ येईल. त्यामुळे जनतेचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न करीत नाहीत. केवळ प्रशासकीय अधिकारी सांगतील त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वागत असतील, तर जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना नियंत्रणासाठी शासनाने स्थानिक आमदारांना फंड वापरण्यास मुभा दिली आहे. तसेच गेल्या वर्षभरात कोरोनाच्या नावावर अन्य विकासकामांना निधी नाही. मग शासनाचा करोडो रुपयांचा निधी कुठे खर्च होत आहे. या निधीतून तालुक्यात ठिकठिकाणी कोविड सेंटरची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न नागरेकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात आमदार, खासदार, मंत्री असून नसल्यासारखेच आहेत. जनतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नसून, सामान्य जनतेचे येथील लोकप्रतिनिधींना काहीही देणेघेणे नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे, असे नागरेकर यांनी म्हटले आहे.