कालव्याच्या अस्तरीकरणच्या कामासाठी मान्यता मिळावी : शेखर निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:55+5:302021-06-16T04:41:55+5:30
तालुक्यातील गडनदी धरण हे मध्यम लघु पाटबंधारे विभागाकडील धरण प्रकल्प असून, या धरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कालव्यांची ...
तालुक्यातील गडनदी धरण हे मध्यम लघु पाटबंधारे विभागाकडील धरण प्रकल्प असून, या धरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या कालव्यांची कामे जवळ जवळ ८० टक्केपेक्षा अधिक झाली आहेत. मात्र, हे कालवे खुले आहेत. गडनदी मध्यम धरण प्रकल्पाच्या सद्य:स्थितीत नलिका वितरण प्रणालीद्वारे उर्वरित कामे सुरू आहेत. प्रकल्पाला सुरुवातीचा २१ किलाेमीटर उजवा व ७ किलाेमीटर डावा कालवा असून, त्याला अस्तरीकरण करणे आवश्यक असल्याची बाब आमदार शेखर निकम यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
जर या कालव्यांना अस्तरीकरण करण्यात आले नाही, तर पाणी नलिका प्रणालीद्वारे शेवटपर्यंत पोहोचू शकणार नाही. तसेच अस्तरीकरण करण्यात आलेले नसल्याने गळती लागू शकते. गळती कायमस्वरूपी थांबण्याकरिता आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कालव्याला अस्तरीकरण करणे प्रामुख्याने गरज बनली आहे. या साऱ्याचा विचार आमदार निकम यांनी करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे.
अस्तरीकरणच्या कामाकरिता नियामक मंडळामध्ये ठराव घेऊन काम सुरू करणेबाबत संबंधित विभागास आदेश मिळावेत, अशी मागणीही केली आहे. कालव्यांची कामे झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यास मदत होणार आहे. अस्तरीकरणामुळे कालवेही मजबूत होण्यास मदत होणार आहे. गडनदी प्रकल्प वाढीव उंचीनुसार न करता आता आहे त्याच उंचीत पूर्ण करण्यात यावा तसेच हा प्रकल्प १५ किलोमीटरपर्यंत अस्तरीकरण करून मिळावे, अशी मागणी शेखर निकम यांनी केली आहे.