रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी आणि ०२ महाराष्ट्र नौदल एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कमांडर एम. एम. सईद यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात, घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून त्यांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयात कार्यरत असलेला राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी विभाग आणि आपत्ती निवारण कक्षातर्फे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले हाेते.
शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कपडे, चादर, चटई, खाद्यपदार्थ आणि अन्य अत्यावश्यक वस्तू महाविद्यालयात जमा केल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन वस्तू संकलित केल्या. त्यानंतर एनसीसी छात्रांनी चिपळूण परिसरातील कळबंस्ते, पेठमाप, टेंबेवाडी येथील पूरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ. सोनाली कदम, एनसीसीचे लेफ्टनंट अरुण यादव, लेप्टनंट डॉ. स्वामीनाथन भट्टर, लेफ्टनंट दिलीप सरदेसाई, कॅप्टन सीमा कदम तसेच महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. महाविद्यालयाचे काही माजी विद्यार्थी चिपळूणमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस मित्र म्हणून काम करून प्रशासनाला सहकार्य करत आहेत.