सोन्याची लकाकी, चांदीची चमक ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:16 PM2021-02-18T14:16:28+5:302021-02-18T14:17:25+5:30
Gold Ratnagiri- सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तशातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस घसरू लागले आहेत. बुधवारी सकाळी सोन्याचा दर दुपारी पुन्हा घसरून ४७ हजारांवर, तर चांदीचा दर ७१,५००पर्यंत खाली आला.
रत्नागिरी : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तशातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस घसरू लागले आहेत. बुधवारी सकाळी सोन्याचा दर दुपारी पुन्हा घसरून ४७ हजारांवर, तर चांदीचा दर ७१,५००पर्यंत खाली आला.
कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस येत असताना त्यांच्यातील गुंतवणूकही घटत गेली. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला होता.
ग्राहकांचा कल सोने - चांदीच्या खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या धातूंच्या दरात लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. त्यामुळे चांदी ५४ हजार रुपये प्रतिकिलोवरून थेट ७,५०० रुपयांची वाढ होऊन ती ६१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. दोन आठवड्यात चांदीमध्ये पुन्हा १० हजार रुपयांची वाढ झाली आणि चांदी ७२ हजारांपर्यंत पोहोचली. लॉकडाऊनपूर्वी चांदी ५०,५०० वर होती, तर सोने ४० हजार रुपयांवर होते.
त्यानंतरही सोने, चांदीच्या दरात कमी जास्त प्रमाणात वाढ होत गेली असली तरी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच सोने - चांदीच्या दरात वाढ झाली. चांदी ७५,५०० वर, तर सोने ५०,५०० वर पोहोचले. मात्र, यादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा होताच चांदी ७४ हजारांवर आणि सोने ४९,५०० पर्यंत खाली आले.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट होऊ लागली आहे. १ फेब्रुुवारी रोजी ४९,५००पर्यंत वर गेलेले सोने आता ४७ हजारांवर आले आहे, तर चांदीचा दरही प्रतिकिलो ७१,५०० पर्यंत आला आहे.
बुधवारी दिवसभरात दोन वेळा या दोन्हीही धातुंच्या दरात घट झाली. मंगळवारी सोन्याचा दर प्रतिग्रॅम ४७०० इतका होता, तर चांदी प्रतिकिलो ७१००० हजार एवढी होती. बुधवारी सकाळी सोन्याचा दर ५०० रुपयांनी घसरून तो ४७,२०० झाला, तर चांदीचा दर १५०० रुपयांनी वाढून ७२,५०० झाला. मात्र, दुपारी पुन्हा दर घसरून सोने ४७,०००वर, तर चांदी ७१,५०० रुपयांवर आली.
गुंतवणूक म्हणून
अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी गुंतवणुकीवरील व्याजदर शून्य केल्याने लोक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीवर विशेष भर देऊ लागले. त्यामुळेच सध्या सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.