शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:45+5:302021-07-12T04:20:45+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून ...
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने कोरोना नसलेल्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग दि. १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी पालकांशी चर्चा करून ठराव करण्याचे सूचित केले आहे. मात्र, पालकांमध्येच संभ्रम असल्याने अद्याप तरी जिल्ह्यातील एकही शाळेने ठराव केलेला नसला तरी पालकांकडून सूचना मात्र मागविल्या आहेत.
नववी व अकरावी हा दहावी व बारावीचा पाया असल्याने या वर्गातील मुलांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही अट महत्त्वपूर्ण असून, शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिवाय कोरोनाबाबतच्या शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नसलेल्या गावांतून शाळा सुरू होऊ शकत असल्या तरी पालकांमध्ये मात्र अद्याप भीतीसह, संभ्रमच आहे.
शासनाच्या अध्यादेशाबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांनीही पालकांच्या व्हाॅटस्अप ग्रुपवर सूचना पाठविल्या आहेत. कोरोना नसलेल्या गावातून शासनाच्या सूचनेनुसार समिती गठित करून शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा ठराव मंजूर करणे गरजेचे असून, तो ठराव शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करायचा आहे. मात्र, अद्याप एकाही गावाने तसा ठराव केलेला नाही.
शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोना नसलेल्या गावांतून सुरू करण्याचा अध्यादेश जाहीर केला आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी समितीने चर्चेतून निर्णय घ्यायचा आहे. शिवाय शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, सध्या पावसाळा असून, साथीचे आजार या काळातच जास्त बळावतात. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे दीपावलीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू कराव्यात. शाळा सुरू करण्याची तूर्तास तरी शासनाने घाई करू नये.
- कविता वाघ, पालक, रत्नागिरी
कोरोनासंबंधी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे जिल्ह्यातील ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या गावांत शाळा सुरू होऊ शकतात. परंतु, त्यासाठीही शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असून, त्यांचे पालनही करणे गरजेचे आहे. शासन मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी विचार करत असले तरी या निर्णयाची अमलबजावणी पावसाळ्यानंतरच व्हावी. काही शिक्षक संबंधित गावात राहत नाहीत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेही कोरोना नसलेल्या गावात त्याचा शिरकाव होण्याचा धोका आहे.
- वेदांत पाटील, पालक, संगमेश्वर
ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या सूचनेनुसार महत्त्वपूर्ण मंडळींची समिती गठित करून त्यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचनांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. सर्वानुमते निर्णय घेत तसा ठराव मंजूर करून पाठवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही योग्य खबरदारी आवश्यक आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी
n गावात किमान एक महिना कोरोना रूग्ण आढळून आलेला नसावा.
n शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे.
n गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
n विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तत्काळ शाळा बंदचा निर्णय घेण्यात यावा.
n मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे.
n कोरोनाबाबत शासकीय नियमावलींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक.