लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सरकारने विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांना कोरोनाकाळात दोन महिन्यांचे आगाऊ अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान जिल्ह्याकडून तालुक्यांकडे वितरित झाले असले तरी काही तालुक्यांकडून ते अद्याप पोस्टाकडे वर्ग करण्यात आलेले नाही. मात्र, सरकारने दिले असले तरी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे अडकून पडल्याने यावर अवलंबून असलेले दिव्यांग तसेच विविध योजनांचे निराधार लाभार्थी ऐन लाॅकडाऊनच्या काळात जोखीम पत्करून पोस्टात चकरा मारत आहेत.
शासनाने कोरोना काळात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या पेन्शनधारकांना दोन महिने प्रत्येकी १००० रुपयांची आगावू आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात सुमारे ४३ हजार निराधार या विविध प्रकारच्या पेन्शनवर अवलंबून आहेत. त्यांना या घोषणेने दिलासा मिळाला आहे.
जिल्हास्तरावरून हे अनुदान २३ एप्रिल रोजी सर्व तालुक्यांना पाठविण्यात आले आहे. मात्र, तहसीलस्तरावरूनच अद्याप या अनुदानाची बिले कोषागार कार्यालयात पाठवून हे अनुदान पोस्टाकडे वर्ग केलेले नाही. त्यामुळे या निराधारांवर उपासमारीची वेळ आल्याने काही जण घरातच पेन्शनची प्रतीक्षा करीत आहेत, तर काही कोरोना काळात जोखीम पत्करून पोस्ट कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत.
याबाबत दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या येथील आस्था दिव्यांग वकालात केंद्राने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. लॉकडाऊन असल्यामुळे दिव्यांगांना व अन्य योजनेच्या निराधार वृद्धांना घराबाहेर पडावे लागू नये, हे अनुदान त्यांना घरपोच केले जावे, असे डाकघर अधीक्षकांना पत्रही काढावयास लावले. एवढेच नव्हे तर यासाठीच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा गुरुवार, २९ रोजी पोस्टालाही सर्व तालुक्यांच्या कार्यालयाला पत्र काढण्यास भाग पाडले.
मात्र, अजूनही हे अनुदान प्रत्येक तालुक्याकडूनच पोस्ट कार्यालयांमध्येच न पोहोचल्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. शासनाने या निराधारांना आर्थिक मदतीचा हात देऊ केला असला तरी संबंधित यंत्रणा अनुदान काढण्याबाबत उदासीन आहेत.
आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे आवाहन
सध्या कोरोनाचे संकट असल्याने वृद्ध व दिव्यांग या जोखीम प्रवण घटकांनी पेन्शनसाठी घराबाहेर पडू नये. अधिक माहितीसाठी आस्था दिव्यांग हेल्पलाईनच्या ९८३४४४०२०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे समन्वयक संकेत चाळके, कल्पेश साखरकर व सुरेखा पाथरे यांनी केले आहे.
ज्या लाभार्थ्यांची खाती पोस्टात आहेत त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान स्वतः पोस्टामध्ये जाऊन घेणे शक्य नाही. याकरिता मागील वेळेप्रमाणे घरपोच मिळावे, अशी मागणी सातत्याने आस्था दिव्यांग वकालात केंद्रामार्फत केली गेली होती. त्यानुसार २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डाकघर अधीक्षक यांना हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या हाती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार डाकघर अधीक्षक यांनी तालुक्यातील त्यांच्या सर्व कार्यालय प्रमुखांना कळविले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप पोस्टाकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या संजय गांधी योजना विभागानेदेखील अधिक विलंब न करता अनुदान पोस्टाकडे वर्ग करावे.
- सुरेखा पाथरे, संचालिका, आस्था सोशल फाउंडेशन