रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत खुल्या गटात हनुमंत चोपडे विजेते
By मेहरून नाकाडे | Published: October 29, 2023 06:40 PM2023-10-29T18:40:16+5:302023-10-29T18:40:51+5:30
जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी : भाट्ये ते गावखडी व परत भाट्ये हे ४५ किमीचे अंतर अवघ्या १ तास २२ मिनिटांत पार करून पुरुषांच्या खुल्या गटात पुण्याच्या सिंहगड फाउंडेशनच्या हनुमंत चोपडे याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे विजेतेपद पटकावले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे कोस्टर सायक्लोथाॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी स्जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोमेंडीच्या शासकीय रोपवाटिकेचे प्रमुख राजेंद्र कुंभारे आणि रेस अक्रोस अमेरिका स्पर्धेचे विजेते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डॉ. महेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
खुल्या गटात साठ स्पर्धक सहभागी झाले होते. भाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता, गोळपला उतार, पावस बायपास रोडची वळणे, चढ, नंतर तीव्र उतार, पुन्हा वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धकांनी सुसाट वेगाने सायकल चालविली. विजेत्यांनी गावखडीला फक्त ४५ मिनिटांत पोहोचून अवघ्या १ तास २२ मिनिटांत पुन्हा भाट्यात पोहोचले. पहिले दहा क्रमांक थोडक्या फरकाने विजेते झाले. जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
पुरुष खुला गट स्पर्धेत (एलाईट)- हनुमंत चोपडे (पुणे), सिद्धेश पाटील (पुणे), हर्ष पवार (पनवेल), विठ्ठल भोसले (पुणे), अश्विन मर्ढेकर (कऱ्हाड), रिहान शेख (परभणी), प्रथमेश दरेकर (पुणे ), हेमंत लोहार (पुणे), आर्यन मालगे (पुणे) आणि ॲशविन फर्नांडिस (गोवा).
४० वर्षावरील गटात अनुप पवार, राजेश रवी (पुणे), सतीश सावंत (पुणे), आशिष जोशी (पुणे), विष्णू तोडकर (कारवार), पंकज मारलेशा (मुंबई), प्रवीण पाटील (मुंबई).
महिला गटात सुजाता वाघेरे (नाशिक), प्राजक्ता सूर्यवंशी (विटा, सांगली), योगेश्वरी कदम (सांगली), अश्विनी देवरे (नाशिक), केनिश डिमेलो (पालघर), शमिका खानविलकर (रत्नागिरी), भावना द्विवेदी (पुणे) तर ५५ वर्षांवरील गटात मेरियन डिसुझा (मुंबई), डॉ. आदित्य पोंक्षे (पुणे), सुधाकर पाटणकर (मुंबई) विजेते ठरले. नॉनगिअर सायकलवरून दोन तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करणारे ८० वर्षीय सायकलपट्टू भीमराव सूर्यवंशी आणि दहा वर्षांची सायकलपट्टू सान्वी पाटील (सव्वादोन तास) यांनाही गौरविण्यात आले.