रत्नागिरी : काेरोना काळात विविध पातळ्यांवर काम करण्यासाठी शहरातील सुमारे २८ सामाजिक संस्थांच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेल्या ‘हेल्पिंग हॅंडस्’ फोरमचे कार्यकर्ते सध्या पहिल्या फळीत विविध ठिकाणी काम करत आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन यांच्या मदतीला धावून आले आहेत. कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याकरिताही साहाय्यभूत ठरत असून, यंत्रणा आणत्रुरूग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या काेरोना रुग्णांमध्ये आता कित्येक पटीने वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरे असल्याने या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. रुग्णसेवा देतानाच त्यांच्या नातेवाइकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करताना जिल्हा प्रशासनाचीही दमछाक होत आहे. वाढत्या संसर्गामुळे अनेक शासकीय कार्यालयांमधील कर्मचारीही कोरोनाबाधित होत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळात अधिकच वाढ होत आहे. त्यामुळे गैरसोयींमध्ये वाढ होत आहे.
अशा परिस्थितीत रुग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील दुवा बनण्याचे काम हेल्पिंग हॅंडसचे सुमारे १०० सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय येथील रुग्णांमध्ये मनोबल वाढविण्याबरोबरच त्यांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी झटत आहेत. जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयात सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. अशावेळी भीतीच्या छायेखाली असलेले रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना महत्त्वाची मदत हे कार्यकर्ते करीत आहेत. या रुग्णांपर्यंत जेवण औषधे पोहोचविणे आदी कामे हे स्वयंसेवक धोका पत्करून करीत आहेत. कोरोना रुग्णालयात दाखल करणाऱ्या रुग्णांचे केसपेपर लिहून देणे, त्यांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. गृहअलगीकरणात असलेल्यांनी संपर्क केल्यावर त्यांना जेवणाचे डबे, औषधे, आणून देणे. एवढेच नव्हे तर जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना त्यांच्या घरी सोडणे ही कामे आज रात्रंदिवस हे स्वयंसेवक करीत आहेत.
शिर्के प्रशालेतील कोरोना चाचणी केंद्र, बीएड काॅलेज, सामाजिक न्याय भवन, आयटीआय येथील सीसीसी तसेच लसीकरण केेद्रांमध्ये सुयोग्य पद्धतीने कामकाज करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेला मदत करीत आहेत. यासाठी त्यांना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आहे.
एकच बॅनर
गेल्यावर्षीप्रमाणे घरात बसलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरी पाेहोचविण्याचे कामही हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते करीत आहेत. आपल्या संस्थेच्या बॅनरखाली काम न करता हे सर्व हेल्पिंग हॅंडसच्या माध्यमातून काम करीत आहेत.
विविध गटांत विभागणी
या कार्यकर्त्यांचे गट तयार करण्यात आले असून, त्यानुसार कुणी कुठे काम करायचे, याचे नियोजन आदल्या दिवशी ठरते. यापैकी ठराविक जणांचा एक गट जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवून असल्याने जिथे जिथे कमतरता असेल त्या ठिकाणी संपर्क करून ती दूर करण्याचा प्रयत्न करतो.