चिपळूण : तालुक्यातील ओवळी कातकरीवाडीमध्ये तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये कातकरीवाडी आदिवासी वस्तीतील कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. आमदार शेखर निकम यांच्यासह काही संस्थांनी येथील कुटुंबांना मदतीचा हात दिला होता.
गेले काही दिवस या कुटुंबांना किराणा मालाची आवश्यकता होती. ओवळी ग्रामपंचायतीच्या सदस्य दीपिका शिंदे यांनी कातकरी वाडीतील वस्तीमधील बाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. कातकरी वस्तीमधील कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप ओवळीच्या सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे यांनी केले. यावेळी सदस्य केशव कदम, निकिता शिंदे, संपदा बोराडे, माधवी शिंदे, माधुरी शिंदे, प्रकाश शिंदे, ग्रामसेवक म्हापार्ले यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.