महामार्ग चौपदरीकरणाची गाडी हळूहळू रुळांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:21 PM2021-03-26T12:21:00+5:302021-03-26T12:22:44+5:30
highway pwd Ratnagiri- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या दरम्यान मध्यंतरी रखडलेले काम आता हळूहळू मार्गी लागले असून, आता चौपदरीकरणाच्या कामाला वेग येऊ लागला आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते गोवा या ४५० किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यापैकी इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या दरम्यान मध्यंतरी रखडलेले काम आता हळूहळू मार्गी लागले असून, आता चौपदरीकरणाच्या कामाला वेग येऊ लागला आहे.
महाराष्ट्रातील पनवेल ते झाराप या एकूण ४५० किलोमीटरचे चौपदरीकरण २०१७ सालापासून सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ३६६.१७० किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चार टप्प्यांत सुरू असून, यासाठी ११७४५.९३ कोटी इतका अंदाजपत्रकीय खर्च मंजूर करण्यात आला आहे. या चार टप्प्यांत इंदापूर ते कशेडी ७७ किलोमीटर, कशेडी पायथा ते संगमेश्वर १०४, संगमेश्वर ते लांजा ८६ किलोमीटर आणि राजापूर ते झाराप ९९.१७ किलोमीटर असे एकूण ३६६.१७ किलोमीटरचे चौपदरीकरण सुरू आहे.
कशेडी ते परशुराम घाटापर्यंतचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, परशुराम घाट ते आरवली या ३५.९ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम केवळ २७ टक्के; आरवली ते कांटे या ४० किलोमीटरचे काम केवळ ८ टक्के आणि कॉंटे ते वाकेड या ५०.९० किलोमीटरचे काम केवळ १२ टक्के झाले आहे. मात्र, वाटूळ ते तळगाव आणि त्यापुढे झारापपर्यंतचे काम सुमारे ९५ ते ९९ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परशुराम घाट ते वाकेड या जिल्ह्यातील चौपदरीकरण करणाऱ्या आधीच्या कंपनीकडून हे काम काढण्यात आले असून, ते नव्या ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता चौपदरीकरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.
रायगड तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील महामार्गाच्या चौपदरीकरणाने गती घेतली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम संथगतीने झाले आहे. त्यामुळे आता ठेकेदार बदलल्यामुळे तरी हे काम पावसाळ्यापूर्वी द्रुतगतीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा पावसाळ्यात रस्ता चिखलमय होण्याची भीती आहे.
सर्वाधिक रत्नागिरीत
इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणात सर्वाधिक २१३ किलोमीटरची लांबी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. रायगड ७० किलोमीटर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लांबी ८२.८७ किलोमीटरची आहे.
कशेडी बोगदा
कशेडी घाटातील बोगद्याचे काम डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरीतील २०५ किलोमीटर लांबीपैकी ७४.९९४ किलोमीटर (डिझाईन लांबी) लांबीचे काम जानेवारी २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. ५० किलोमीटरचे काम जून २०२१, तर ८८ किलोमीटरचे जून २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
निम्म्या क्षेत्राचे संपादन
इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील भूसंपादनाचे क्षेत्रफळ २०१८.३८ हेक्टर असून, त्यापैकी ९७९.२९ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. अजून १०४० हेक्टर क्षेत्राचे संपादन करावयाचे बाकी आहे.
निम्म्या पुलांचे काम पूर्ण
इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किलोमीटरच्या चौपदरीकरणादरम्यान २४ मोठे पूल असून, यापैकी १२ पूर्ण झाले आहेत. ८५ लहान पुलांपैकी ५२, १५८७ मोऱ्यांपैकी ९११, ७७ अंडरपासपैकी ३६ पूर्ण झाले असून, उर्वरित प्रगतीपथावर आहेत. १.८० किलोमीटरच्या बोगद्यापैकी ०.९ किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून, उर्वरित काम सुरू आहे.