राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विविध ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळमार्गी केला जाईल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे अर्जुना नदीवरील पुलाच्या येथील कोंढेतडनजीकच्या वळणासारखी अनेक वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, तरीही अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जात असलेली वाटूळ, नेरके येथील यू आकाराची वळणे, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणे ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास निर्धोक होण्याऐवजी भविष्यामध्ये अपघातांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या वाकेड ते तळगाव हद्दीत वाटूळ-ओणी आणि त्यानंतर हातिवलेपासून तळगावपर्यंत सुमारे ३७ किलाेमीटरच्या कामाचा समावेश आहे. यामध्ये रस्त्याच्या बहुतांश ठिकाणचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यातच, काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी ते सुरू आहे. नागमोड्या वळणांच्या असलेल्या या रस्त्याचा चालकांना अंदाज येत नसल्याने त्यातून अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातून, साऱ्यांनी उठाव करून मुंबई-गोवा महामार्गाचे चाैपदरीकरण व्हावे, अशी मागणी रेटून धरली अन् आता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
चौपदरीकरणामध्ये नागमोड्या वळणांना फाटा देण्यात आल्याने महामार्गावरील भविष्यातील अपघातांची संख्या कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. त्याप्रमाणे काही ठिकाणची नागमोडी आणि धोकादायक वळणे चौपदरीकरणाच्या कामामध्ये काढण्यातही आली आहेत. मात्र, अनेक वळणे अद्यापही जैसे थे स्थितीमध्ये आहेत ज्यांच्यामुळे भविष्यात अपघातांना निमंत्रण मिळू शकते. त्यामध्ये वाटूळ आणि नेरके येथील यू आकाराचे वळण, पन्हळे येथील टाकीवाडीजवळील वळण, आदी वळणांचा समावेश आहे. यू आकाराच्या या वळणांवर गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे ही वळणे अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखली जातात.
...............................
मोकाट जनावरांचा प्रश्न
कोकणामध्ये मोकाट गुरे सोडली जातात. ही गुरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत असतात. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेगही सुसाट असणार आहे. सुसाट धावणाऱ्या एखाद्या गाडीसमोर अचानक मोकाट जनावर आडवे आल्यास त्यातून अपघात होणार आहे. त्याचाही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.
.................................
महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये धोकादायक वळणे काढून रस्ता बहुतांश ठिकाणी सरळ केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक ठिकाणची धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चौपदरीकरणामध्ये प्रवास सुखकारक होण्याऐवजी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
- मनोहर गुरव, राजापूर