रत्नागिरी : देशावर झालेल्या मोगलांच्या आक्रमणानंतर महिलांच्या आयुष्याला ग्रहण लागले. या काळात महिलांवरील अत्याचार वाढले. तसेच देशात कायद्याची भीती फार कमी होत आहे. कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची खंत महिला अत्याचार, प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदी याबाबत मार्गदर्शन करताना कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि मातोश्री स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते म्हणाले, पूर्वीच्या काळी वेदांमध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान होते. लग्नासाठी स्वयंवर मांडून ती आपला पती निवडत होती. आपला जोडीदार कसा असावा, हे निवडण्याचे अधिकार महिलांना होते. दहाव्या शतकापर्यंत महिलांचा सन्मान केला जात होता. मात्र, मोगलांच्या आगमनानंतर महिलांच्या आयुष्याला ग्रहण लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी गौरव पुरस्कार, आरोग्यविषयक विविध योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांना आदर्श पुरस्काराने शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्यातील अंगणवाडीसेविका शारदा मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.