वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:30 PM2022-12-12T12:30:28+5:302022-12-12T12:31:04+5:30
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण ...
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अपेक्षित गारठा नसून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
बंगालच्या उपसागरात मंदूस चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेले वादळ पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेने गारठा गायब झाला असून, तापमानातही किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी पुन्हा गायब झाल्याने पहिल्याच टप्प्यात आंबा बागायतदारांच्या समस्येत वाढ झाली आहे.
पावसाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे कीडरोग संरक्षक फवारण्या व त्यावरील खर्च वाढणार आहे. सध्या केवळ पालवी असून, किरकोळ आलेला मोहोर व पालवीच संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना हवामानाचा अंदाज घेत फवारण्या कराव्या लागत आहेत. पालवीचे मोहोरात व मोहोराचे फळात रूपांतर होत असताना प्रतिकूल हवामानाचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. वेळोवेळी फवारण्या कराव्या लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहेत.