लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तिवरे धरणग्रस्तांसाठी अलोरे येथे बांधलेल्या घरांना गळती लागलेली नाही. शेदावामुळे ते पाण्याचे थेंब साचून राहिले होते. आता तेही निघून गेले आहेत. तसेच वॉटर प्रुफिंगचा एक थर अद्याप शिल्लक आहे. पावसाळ्यानंतर तो करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला गळती म्हणणे योग्य नाही. प्रकल्पाची किरकोळ कामे अद्याप शिल्लक असून, ती पूर्ण केली जात आहेत, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित बांधकाम कंपनीने पत्रकारांशी बोलताना केला आहे.
तिवरे धरणग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी चिपळूण अलोरे येथील शासकीय जागेत घरे बांधण्यात आली आहेत. सिद्धिविनायक न्यासाने त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे २४ घरे उभारण्यात आली. त्यापैकी १० घरांचे लोकार्पण २ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु लगेच येथील काही घरांना गळती लागल्याचे सांगण्यात आले. एका वृद्ध धरणग्रस्त महिलेने तशी माहितीही दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता मीनल माने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकल्पाचे काम बारीक लक्ष ठेवून करण्यात आले आहे. येथील प्रचंड प्रमाणात कोसळणारा पाऊस लक्षात घेता स्लॅबच्यावर विटांचे थर आणि जादा काँक्रीटकरण केले आहे. तसेच वॉटर प्रुफिंग लेयरही आहे. तूर्तास विटांमधील पाणी शेदावामुळे खाली येत असावं. परंतु, स्लॅबला गळती लागली असे म्हणता येणार नाही. जी कामे अपूर्ण असतील ती पूर्ण करून घेतली जातील. तसेच पुढील दोन वर्षे ठेकेदारच देखभाल दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.