ऋषिकेश सनगरेने आधी ठरवून केला भिकाजी कांबळेंचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 04:05 PM2019-04-24T16:05:03+5:302019-04-24T16:07:09+5:30
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील घारपुरेवाडीत लग्नाला विरोध केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश सनगरे याला प्रथम अटक झाली होती. त्याने सहा महिने आधीच रिव्हॉल्वरची खरेदी केली होती. त्यामुळे कांबळे यांना मारण्याचा त्याचा कट नियोजित होता, असे प्राथमिक तपासानंतर स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे गावातील घारपुरेवाडीत लग्नाला विरोध केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी ऋषिकेश सनगरे याला प्रथम अटक झाली होती. त्याने सहा महिने आधीच रिव्हॉल्वरची खरेदी केली होती. त्यामुळे कांबळे यांना मारण्याचा त्याचा कट नियोजित होता, असे प्राथमिक तपासानंतर स्पष्ट होत आहे.
त्यानंतर आणखी दोघांना याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली. संदीपकुमार यादव (२६, उत्तरप्रदेश) व चंदनकुमार कुशवहा (२६, रा. मुजफ्फरनगर, बिहार) अशी या संशयितांची नावे असून, त्यांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ एप्रिलपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली आहे.
ऋषिकेश याचे मृत कांबळे यांच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, त्याला मृत भिकाजी कांबळे यांचा विरोध होता, तर मुलीचाही त्याच्याशी लग्नास नकार होता. त्यातच कांबळे कुटुंबाला ऋषिकेश सनगरे याने १० हजार रुपये दिले होते. ते दिले नाहीत, याचा राग होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कोतवडे येथे भिकाजी कांबळे यांचा रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्याने खून केल्याचे तपासात पुढे आले. खून झाला त्याच दिवशी सनगरे याला अटक करण्यात आली होती.
खुनासाठी वापरलेले शस्त्र त्याने कोठून आणले, याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरिवली येथील चंदन व संदीप यांनी आपल्याला बिहारमधून हे शस्त्र आणून दिल्याची माहिती सनगरे याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर हे शस्त्र पोलिसांनी हस्तगत केले व मुंबईत राहणाऱ्या चंदन व संदीप या संशयित आरोपींना अटक केली. हे शस्त्र सनगरे याने नोव्हेंबर २०१८मध्ये ३५ हजार रुपयांना त्या दोघांकडून विकत घेतल्याचे तपासात पुढे आले.
दोन आरोपींनी सनगरेला शस्त्र विक्री केलेली असल्याने यामागे रॅकेट काम करीत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे या रॅकेटचा शोध घेण्यासाठी या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता या रॅकेटचा तपास पोलीस करणार आहेत.